मुंबईची खबर : उकाड्याने हैराण मुंबईकरांची एसी लोकलला पसंती, 'इतका' वाढला रेल्वेचा महसूल
वाढत्या उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी मुंबईकर उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा कल आता वेगाने एसी लोकलकडे झुकत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे रेल्वेच्या महसूलात भरघोस वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : उकाड्याने हैराण मुंबईकरांची एसी लोकलला पसंती
'इतका' वाढला रेल्वेचा महसूल
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी आणि सोयीस्कर व्हावा यासाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर सुरू केलेल्या एसी लोकल सेवांना प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि आरामदायी प्रवासासाठी मुंबईकर उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा कल आता वेगाने एसी लोकलकडे झुकत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे.
फेऱ्यांच्या संख्येत दुप्पट वाढ
हार्बर मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 1 मे रोजी आणखी 14 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू केल्या आहेत. या नव्या फेऱ्यांच्या समावेशामुळे हार्बर मार्गावरील एकूण एसी सेवांची संख्या आता थेट 28 वर पोहोचली आहे. फेऱ्यांची संख्या दुप्पट झाल्यामुळे प्रवाशांना गाड्यांसाठी जास्त वेळ ताटकळत राहावे लागत नाही, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांचा प्रवास अत्यंत सोयीचा आणि विनाव्यत्यय होत आहे.
हे ही वाचा : इंटेलिजन्स ब्युरोचा इशारा, अन् कॉकरोज जनता पार्टीचं X हँडल बंद, इन्स्टा अकाऊंटवरही कारवाई?
प्रवासी संख्येत मोठी वाढ
नव्या फेऱ्या सुरू झाल्यापासून अवघ्या काही दिवसांतच प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत 2.34 लाख प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला होता. मात्र, 1 मे ते 15 मे या अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत हा आकडा थेट 3.83 लाखांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच प्रवाशांच्या संख्येत तब्बल 64.97 टक्के इतकी मोठी आणि आश्वासक वाढ झाली आहे.
हे ही वाचा : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली..
रेल्वेच्या महसुलातही भरघोस वाढ
प्रवासी संख्यसोबत मध्य रेल्वेच्या तिजोरीतही मोठी भर पडली आहे. 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान रेल्वेला एसी लोकल तिकिटांमधून 1.18 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. फेऱ्या वाढल्यानंतर म्हणजेच 1 मे ते 15 मे या काळात महसूल 66.43 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे मिळणारा महसूल 1.96 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकिट तपासण्याच्या मोहिमेला देखील वेग आला आहे.









