मुंबईची खबर : 'या' प्रवाशांना बेस्टमधून करता येणार मोफत प्रवास, काय आहे निर्णय?

मुंबई तक

बेस्टमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बीएमसीने दिव्यांग व्यक्तींना दिलासा देण्यासाठी अनुदानाचा प्रस्ताव समोर आणला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : 'या' प्रवाशांना बेस्टमधून करता येणार मोफत प्रवास

point

काय आहे निर्णय?

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिकेने बस प्रवासाशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना दिलासा देण्यासाठी बेस्टला 7.64 कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव समोर आणला आहे. या प्रस्तावानुसार, 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना बेस्टच्या साध्या म्हणजेच विना-वातानुकूलित बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. हा प्रस्ताव 9 सप्टेंबर रोजी बीएमसी स्थायी समितीसमोर अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार असून, मंजुरी मिळाल्यास हा निर्णय दिव्यांगांच्या सर्व श्रेणींसाठी लागू होईल.

दिव्यांग प्रवर्गातील प्रवाशांना लाभ

सध्या बेस्टतर्फे केवळ दृष्टीबाधित प्रवाशांनाच मोफत प्रवासाची सवलत दिली जाते, परंतु या नव्या योजनेमुळे या सवलतीचा विस्तार होऊन इतर दिव्यांग प्रवर्गातील पात्र प्रवाशांनाही याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी एकूण 7,64,55,170 रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यापैकी 5 कोटी रुपयांची रक्कम दिव्यांग कल्याणकारी योजनांच्या तरतुदीतून उपलब्ध करून दिली जाईल. उर्वरित 2.64 कोटी रुपयांची रक्कम नियोजन विभागातील इतर शीर्षांमधून निधी पुनर्रचनेद्वारे वळती केली जाईल.

हे ही वाचा : सांगली : केतनराज अ‍ॅकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संस्थापकाला अटक

साध्या बसेसपुरतीच मिळणार सुविधा

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या बजेटमधील किमान 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी राखणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर, बीएमसी सार्वजनिक वाहतुकीत दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या या सवलतीचा संपूर्ण खर्च बेस्टला प्रतिपूर्ती स्वरूपात देणार आहे. ही सेवा केवळ साध्या बसेसपुरतीच मर्यादित राहील आणि वातानुकूलित (AC) बसेस या योजनेच्या कक्षेत असणार नाहीत.

हे ही वाचा : तोडगा निघणार कसा? 3 मागण्या ज्यामुळे जरांगे मागे हटतच नाहीयेत..

गैरवापर कसा टाळणार?

या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी व गैरवापर टाळण्यासाठी प्रशासनाकडून आर्थिक व अंमलबजावणीचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, पात्र दिव्यांगांची ओळखपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी बेस्ट प्रशासनाची असेल. तसेच, बेस्टला इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रांचे रेकॉर्ड आणि प्रवाशांच्या कागदपत्रांच्या आधारे तिमाही लेखापरक्षित बिले बीएमसीकडे सादर करावी लागतील, त्यानंतरच संगणकीय प्रणालीद्वारे ही प्रतिपूर्ती केली जाईल.