करोडोंची मालमत्ता असूनही आदिवासी बांधव हलाखीत, साडेचार एकर जमिनीवर बिल्डरचा डल्ला!

मुंबई तक

मुंबईतील गोरेगाव-मालाड परिसरातील साडेचार एकर आदिवासी जमिनीवरून नडगे कुटुंब आणि बिल्डरमध्ये वाद निर्माण झाला आहे. जमीन हस्तांतरण, 99 वर्षांचा लीज करार आणि सातबारा फेरफाराच्या आरोपांमुळे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.

ADVERTISEMENT

mumbai tribal land dispute builder nadge family 45 acre land case
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

मुंबई: एकीकडे मुंबईत जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना, दुसरीकडे याच शहरात कोट्यवधींची जमीन असलेले आदिवासी कुटुंब मात्र आर्थिक अडचणींशी झुंजत असल्याचे समोर आले आहे. गोरेगाव-मालाड परिसरातील फिल्म सिटी रोडजवळील सुमारे साडेचार एकर मोक्याच्या आदिवासी जमिनीवरून नडगे कुटुंब आणि खासगी विकासक यांच्यातील वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवून बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप नडगे कुटुंबीयांनी केला आहे.

नडगे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, बिल्डर सलीम अकबर लालानी आणि गुलाम अकबर लालानी यांनी तुळशीबाई रामा नडगे आणि त्यांच्या वारसांच्या मालकीच्या जमिनीवर 1986 मध्ये करण्यात आलेल्या 99 वर्षांच्या लीज कराराचा आधार घेत ताबा मिळवला. मात्र, ही जमीन आदिवासींची असल्याने तिच्या हस्तांतरणासाठी कायद्यानुसार आवश्यक असलेली पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का, यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 36 आणि 36(अ) नुसार अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची जमीन हस्तांतरित करण्यावर कठोर निर्बंध आहेत. संबंधित परवानग्यांशिवाय आदिवासी जमीन इतर व्यक्तीच्या नावे करता येत नाही, असा कायदेशीर नियम आहे. त्यामुळे 1986 मधील व्यवहाराच्या वैधतेवर नडगे कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा वळण तेव्हा आले, जेव्हा संबंधित कुटुंब आदिवासी असल्याच्या दाव्यावरच विकासकाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे नडगे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या अनुसूचित जमातीच्या दाव्याची पडताळणी करण्यात आली.