पुरुषसत्ताक माज 'अनभिषिक्त देवदासी' कादंबरीमुळं कमी होईल: भीमराव पांचाळे
गोपाल रायबोले लिखित 'अनभिषिक्त देवदासी' कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
ADVERTISEMENT

मुंबई: काही कथा फक्त वाचल्या जात नाही. त्या मनाला हादरवून सोडतात. श्रद्धेच्या नावाखाली जे घडतंय, त्याला देव मान्यता देतो की समाज असा प्रश्नच आहे. मात्र गोपाल रायबोले यांच्या 'अनभिषिक्त देवदासी' या कादंबरीनं पुरुषसत्ताक माज या कमी होईल, असं प्रतिपादन गझलनवाल भीमराव पांचाळे यांनी केलं. ‘अनभिषिक्त देवदासी’ ही केवळ एका स्त्रीची कथा नाही; ती एका संपूर्ण व्यवस्थेची कथा आहे, असं पांचाळे म्हणाले.
लेखक गोपाल रायबोले यांच्या 'अनभिषिक्त देवदासी’या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मीरारोड येथे नुकताच पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गजलनवाज भीमराव पांचाळे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, अभिनेता अंकुर वाढवे, लेखक दिग्दर्शक उदय जाधव, लेखक श्रीधर पवार, कवी लेखक अविनाश उषा वसंत, अभिनेता प्रवीण डाळींबकर, समीक्षक डॉ रेवत कानिंदे, पत्रकार निलेश झालटे, प्रकाशक शशिकांत पवार उपस्थित होते. कादंबरीचं भाष्य कवी वैभव छाया यांनी केलं.
हे ही वाचा>> मुंबई-पुणे महामार्ग दोन दिवस 'एवढे' तास राहणार बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर
लावणीसम्राज्ञी तथा अभिनेत्री मेघा घाडगे यांनी या कादंबरीचं स्वागत करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कादंबरीत मांडलेला पुरुष सर्वांना मिळावा. मला या कादंबरीतील नायिकेची कथा ही माझीच कथा वाटते, असं घाटगे म्हणाल्या. यावेळी ही कादंबरी महिलेनं लिहिलीय असं वाटलं असं म्हणत लेखक श्रीधर पवार यांनी या कादंबरीचं कौतुक केलं. रायबोले यांच्या लेखनात नामदेव ढसाळ यांची छाप दिसते असंही ते म्हणाले.

अनेक गोष्टी पाहून आपण अस्वस्थ होतो. माझ्या अस्वस्थतेतूनच ही कादंबरी आलीय. ही कादंबरी आपल्याला दाखवते की देवदासी प्रथा केवळ इतिहासात नाही; ती आजही अस्तित्वात आहे कधी उघडपणे, कधी अदृश्य स्वरूपात. जेव्हा स्त्रीच्या शरीरावर समाज हक्क सांगतो, जेव्हा तिच्या आयुष्याचे निर्णय तिच्या परवानगीशिवाय घेतले जातात, तेव्हा ती “अनभिषिक्त देवदासी” बनते, असं मनोगतात लेखक गोपाल रायबोले म्हणाले.









