Pune Loksabha : काँग्रेसच्या जागेवरच राष्ट्रवादीचा ‘डोळा’; पुण्यात नवं राजकारण
पुण्याची जागा भाजपच्या विरोधात काँग्रेस लढत असताना आता जयंत पाटील आणि प्रशांत जगताप यांच्या वक्तव्यांमुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ADVERTISEMENT

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं २९ मार्चला दीर्घ आजाराने निधन झालं. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चा होण्यामागे दोन तीन घटना महत्त्वाच्या ठरल्या. बापट गेल्यानंतर दोन ते तीन दिवसातच केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला होता. पुण्याची जागा भाजपच्या विरोधात काँग्रेस लढत असताना आता जयंत पाटील आणि प्रशांत जगताप यांच्या वक्तव्यांमुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नेमकं पुण्याच्या लोकसभेवरुन काय राजकारण रंगतंय हेच आपण समजावून घेऊयात…
सुरुवातीला आत्तापर्यंत काय घडलंय आणि कसं राजकारण रंगलंय ते समजावून घेऊयात…
पुण्याचे खासदार गिरीश बापट गेल्या वर्षभरापासून आजाराशी झुंज देत होते. २९ मार्चला उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर दोनच दिवसात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्याच्या लोकसभेच्या जागेबाबत वक्तव्य केलं. पुण्याती लोकसभेची जागा महाविकास आघाडी लढेल असं ते म्हणाले. त्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. पवारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करुन दिली होती.
हे सगळं होत असताना भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या एका फ्लेक्समुळे पुन्हा वाद निर्माण झाला होता. जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या एका फ्लेक्सवर पुण्याचे भावी खासदार असा त्यांच्या उल्लेख करण्यात आला होता. त्यांच्या या फ्लेक्समुळे त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका झाली. त्यानंतर मुळीक यांनी त्यावर स्पष्टीकरण देखील दिलं होतं.
मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक दावेदारीच्या शर्यतीत
गिरीश बापट यांच्या जाण्यामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. जर बापट कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देण्यात आली तर ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी या जागेसाठी भाजपमध्येच अनेक दावेदार आहेत. बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी त्याचबरोबर शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे दावेदारीच्या शर्यतीत आहेत.










