समजून घ्या: खिडक्या आणि डबे सगळंच बदललं, स्वयंचलित बंद दरवाजाची लोकल आहे तरी कशी?
स्वयंचलित बंद दरवाजाची मुंबई लोकल सुरू केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. ज्याबाबत आता सरकार गांभीर्याने विचार करत असून अशा लोकलची रेल्वेकडून चाचणी देखील सुरू झाली आहे. समजून घ्या याचविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

मुंबई: जून 2025 मध्ये मुंबईजवळच्या मुंब्रा जवळ दरवाजात लटकत असलेल्या 5 प्रवाशांचा चालत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला. यानंतर लोकलमध्ये लटकून होणारा प्रवास, प्रवाशांची सुरक्षा यावरून सरकारला प्रश्न विचारण्यात आले. फडणवीस सरकार आणि ज्यांच्या खरं तर अंतर्गत विषय येतो त्या केंद्र सरकारकडूनही स्वयंचलित बंद दरवाजाची मुंबई लोकल सुरू केली जाईल असं आश्वासन दिलेलं. बऱ्याचदा अशी आश्वासनं हवेतच विरतात पण याबाबतीत तर तसं झालेलं नाही. मुंबईत नॉन एसी पण स्वयंचलित दरवाजाच्या नव्या मुंबई लोकल आल्या आहेत. कशा असणार आहेत या लोकल, दरवाजे बंद तर वेंटिलेशनबाबत काय खात्री बाळगण्यात आली आहे, डबे कसे असतील, तिकीट दरात बदल होणार का या सगळ्याची उत्तरं समजून घेऊयात.
मुंबईतल्या कुर्ला कारशेडमध्ये नॉन एसी स्वयंचलित बंद दरवाजाच्या लोकल 13 एप्रिलला दाखल झाल्या आहेत. चेन्नईतल्या ICF ने ही लोकल बनवली आहे. एसी लोकलप्रमाणेच या लोकलचे दरवाजे प्रवासादरम्यान बंद असतील जेणेकरून प्रवासी सुरक्षित राहतील. दिसायला एसी लोकलसारखीच ही लोकल दिसतेय, पण आतली सिस्टिम थोडी वेगळी आहे.
या लोकलमध्ये नेमकं काय-काय असणार?
1. एकूण 12 डबा असतील
2. 8 सेकंड क्लास आणि 4 फर्स्ट क्लास
3. 5 सेकंड क्लास आणि 2 फर्स्ट क्लास महिलांसाठी राखीव
4. 5698 प्रवाशांची क्षमता, 1003 बसू शकतात, 4695 उभ्याने प्रवास करू शकतात
5. दिव्यांगांसाठी स्वतंत्र डबा
6. लोकलच्या सुरूवातीला आणि शेवटी लगेज डबा, ज्यात ठराविक वेळेत महिलांनाही प्रवाशाची परवानगी
त्या पलिकडे आतून ही लोकल जशी दिसतेय, त्यामध्ये खिडक्या आता असलेल्या लोकलपेक्षा वेगळ्या आहेत. आताच्या नॉन एसी लोकलप्रमाणे छोट्या खिडक्या न ठेवता त्या मोठ्या खिडक्या आहेत, शिवाय त्याचे स्लायडिंगही काचेचे आहेत, जसे बेस्ट बसला आहेत. नॉन एसी लोकल आणि बंद दरवाजांमुळे वेंटिलेशनचा प्रश्न होता, अनेकांना शंका आहे की गुदमरल्यासारखं होईल या लोकलमध्ये, म्हणूनच या नव्या लोकलमध्ये खिडक्या मोठ्या आहेत, तसंच दरवाजांमध्येही वेंटिलेशनची सोय दिसतेय, त्यामुळे हवा खेळती राहील याची पुरेशी काळजी घेतली आहे.









