महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असलेली भेंडवळची भविष्यवाणी हा नेमका प्रकार आहे तरी काय?
भेंडवळची भविष्यवाणी ही 370 वर्षांची परंपरा आहे. परंतु या भविष्यवाणीचा नेमका प्रकार काय, भाकित कसं वर्तवलं जातं याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बुलढाणा: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात वसलेले भेंडवळ हे छोटेसे गाव दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर एका अनोख्या परंपरेमुळे चर्चेत येतं. ही परंपरा म्हणजे भेंडवळची घटमांडणी किंवा भेंडवळची भविष्यवाणी, जी गेल्या साडेतीनशे वर्षांपासून (सुमारे 370 वर्षे) चालत आली आहे. या भविष्यवाणीतून पाऊस, शेती, पिके, हवामान, राजकीय परिस्थिती, आर्थिक घडामोडी आणि सामाजिक बदलांबाबत भाकिते वर्तवली जातात. विशेषतः विदर्भ आणि खान्देशातील शेतकरी या भविष्यवाणीकडे मोठ्या आशेने पाहतात, कारण त्यांच्या शेतीच्या नियोजनात याचा मोठा वाटा असतो.
भेंडवळची भविष्यवाणी म्हणजे काय?
भेंडवळची भविष्यवाणी ही एक प्राचीन परंपरा आहे, जी नीलवती विद्या आणि निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारित आहे. ही परंपरा चंद्रभान महाराज यांनी सुमारे 370 वर्षांपूर्वी सुरू केलेली. त्यांचे वंशज, विशेषतः पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ, दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ही घटमांडणी करतात. या प्रक्रियेत निसर्गातील बदल, पशुपक्ष्यांचे संकेत आणि परंपरागत ज्ञानाचा वापर करून वर्षभराचे भाकित वर्तवले जाते.
हे ही वाचा>> भारत-पाकिस्तान युद्ध होणार का? कोणत्या महिन्यात पडणार मुसळधार पाऊस? प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी वाचून थक्कच व्हाल
घटमांडणीची प्रक्रिया:
स्थान: ही प्रक्रिया भेंडवळ गावातील नरहरी शिवराम वाघ यांच्या शेतात होते.
प्रक्रिया: एका मातीच्या घटाभोवती दीड फूट अंतरावर 18 प्रकारची धान्ये ठेवली जातात. या घटाच्या हालचाली, त्यातील बदल आणि निसर्गातील संकेत (उदा., प्राणी, कीटक, वारा) यांच्या आधारे भाकित तयार केले जाते.










