त्र्यंबकेश्वर वाद : अजित पवार तापले, दंगलीचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांवर प्रहार
त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्रात दंगलीच्या घटना घडल्या, याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे, असंही पवार म्हणाले.

Trimbakeshwar Temple Controversy News : त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धूप दाखवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. धूप दाखवण्याची परंपरा जुनी असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. दुसरीकडे भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले हे खरं नसल्याचा दावा करत आहे. यावरून त्र्यंबकेश्वरमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी सुरू असून, यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका मांडताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे. (Ajit Pawar Reaction on trimbakeshwar temple controversy)
अजित पवार यांनी मुंबई माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंदिराला धूप दाखवण्याची प्रथा नाही, असा दावा भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले, “कसली प्रथा नाहीये? तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा. मी हिरामण खोसकरशी बोललो. मी छगन भूजबळ यांच्याशी बोललो. मी नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांशी बोललो.”
हेही वाचा >> BJP: ‘तुमची पदं भाजपमुळे हे विसरू नका’, मंत्री उदय सामंत-दादा भुसेंना भाजप सहमुख्य प्रवक्त्याने सुनावलं
याच मुद्द्यावर अजित पवार पुढे म्हणाले, “आपल्यालाही माहितीये की, मणिपूरमध्ये जी दंगल झाली, त्या दंगलीचा किती परिणाम झाला. उलट मेरी कोमने त्यावेळी आव्हान केलं होतं. केंद्र सरकारने, राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा. मणिपूरमधील आठ जिल्ह्यात जी दंगल झाली, त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांची घरं जाळली गेली. अनेकजण बेघर झाले. निष्पाप लोक मारले गेले, जखमी झाले. तसं देशात कुठेही घडता कामा नये. परंतू औरंगाबाद, अकोला, शेवगाव, अहमदनगर आणि त्र्यंबकेश्वर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या दंगली झाल्या. काय कारण होतं?”, असा सवाल विरोधी पक्षनेते पवार यांनी उपस्थित केला.
100 वर्षांची परंपरा, अजित पवारांनी सांगितला आजीसोबतचा किस्सा
“आम्ही देखील राजकीय जीवनात बऱ्याच वर्षापासून काम करतो. राजकारणात नव्हतो, त्यावेळी देखील आजीसोबत दर्शनासाठी जायचो. मग तिथं दर्शनाला गेल्यावर सर्व जातीधर्माची लोकं तिथं दर्शन घ्यायचे. आपल्यामध्ये पद्धत आहे की, देवाचं दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला गुरुद्वारात जायचं असेल, तुम्हाला चर्चमध्ये जायचं असेल, दर्ग्यावर चादर चढवायची असेल, तर आपण जातो, चढवतो. पण, त्र्यंबकेश्वरचे जे स्थानिक लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की, ही 100 वर्षांपासूनची परंपरा आहे. बाहेरच्या बाहेर ते जातात. आतमध्ये कुणी जात नाही. हुसैन दलवाईसुद्धा गेले होते. त्यांनीही बाहेरून दर्शन घेतलं. काही ठिकाणी प्रथा असतात”, असं अजित पवार या वादावर म्हणाले.
कान्हेरीच्या हनुमान मंदिरात काय आहे प्रथा?
“आमच्या इथेही कन्हेरी म्हणून गाव आहे. जिथं 1967 सालापासून कुठल्याही प्रचाराचा प्रारंभ आम्ही मारूतीला नारळ फोडून करतो. तिथं मारूतीच्या मंदिरातील गाभाऱ्यात जायला महिलांना प्रवेश नाही. महिला बाहेरूनच दर्शन घेऊन निघून जातात. हे चालत आलेलं आहे, लोक पाळतात. कुणी काय पाळावं. कसं पाळावं, हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. परंतू भावनिक मुद्दा करू नका. याच्यामध्ये राजकारण आणू नका. जाती जातींमध्ये, धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये. असं आमचं आवाहन आहे. त्याबद्दल स्थानिक लोकांनी पण तशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी या वादावर मांडली.
‘फडणवीस बैठक घेत असतील, पण…’
राज्यात घडलेल्या हिंसक घटनांसंदर्भात अजित पवार म्हणाले, “यासंदर्भात मुख्यमंत्री जबाबदार असतात, कारण ते राज्याचे प्रमुख असतात. दुसरं गृहमंत्री जबाबदार असतात. आम्ही राजकारणात आल्यापासून गृहमंत्रीपदाची जबाबदारी आर. आर. पाटलांनी सांभाळली होती. अशा गोष्टी घडल्यानंतर आर आर पाटील याबद्दल तातडीने बैठक घ्यायचे. सूचना करायचे. आताचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतील, पण हे नियंत्रणात येत नाहीये. हे वाढत आहे. याच्यातून समाजा समाजामध्ये अंतर पडत आहे.”
हेही वाचा >> काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?
“कारण नसताना दंगलीमुळे गोरगरीब जनतेला त्याची किंमत मोजावी लागते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून कुणाचाही हस्तक्षेप तिथले पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक असतील किंवा इतर पोलीस अधिकारी असतील त्यांना पूर्णपणे मूभा दिली पाहिजे. हे करताना हे सांगितलं पाहिजे की, तुम्ही जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आहात. तुम्ही तुमचे सगळे पोलीस स्टेशनच्या खालच्या अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या द्या. जर तुमच्या भागात दंगल झाली, तर आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखाला जबाबदार धरू. जर महापालिकेच्या भागात पोलीस आयुक्तांना जबाबदार धरलं पाहिजे. असं करून त्यांना खबरदारी घेण्यासाठी पूर्णपणे मूभा दिली. मोकळीक दिली तर प्रशासन, पोलीस हे आटोक्यात आणेल, असं माझं स्वतःचं मत आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.