टिटवाळ्यात पाच वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय शेजाऱ्याने केला बलात्कार, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
A 25-year-old neighbor raped a five-year-old girl in Titwala, a case under POCSO was registered
A 25-year-old neighbor raped a five-year-old girl in Titwala, a case under POCSO was registered(प्रातिनिधिक फोटो)

कल्याणजवळच असलेल्या टिटवाळा या भागात एका पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या २५ वर्षांच्या शेजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कल्याण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातला २५ वर्षीय आरोपी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथक पाठवलं आहे.

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे?

आरोपी पीडितेच्या शेजारी राहणारा २५ वर्षीय युवक आहे. त्यामुळे पीडित मुलगी या युवकाला ओळखत होती. आरोपी मजुरीचं काम करतो. पीडित मुलीच्या घरापासून २० मीटर अंतरावर असलेल्या एका खोलीत हा आरोपी त्याच्या काही साथीदारांसह राहतो. तो कधी कधी पीडितेच्या घरी जात होता. जेव्हा या पीडित मुलीचे आई वडील कामासाठी बाहेर जातील तेव्हा तो या मुलीला सांभाळतही होता. पीडित मुलीचे वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत. मुलीच्या वडिलांची मदत आरोपीने अनेकदा केली आहे त्यामुळे त्याच्यावर मुलीच्या आई वडिलांनी विश्वास ठेवला होता.

नेमकी काय घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी ३ वाजता पीडित मुलगी तिच्या घरी होती. तिची आई झोपली होती. त्यावेळी हा युवक पीडितेला आपल्योसबत घेऊन गेला. काही लोकांनी या पाच वर्षांच्या मुलीला युवकासोबत जातानाही पाहिलं. हा युवक तिला त्याच्या खोलीवर घेऊन आला. तिथे त्याचा साथीदार नव्हता. या ठिकाणी आल्यानंतर त्याने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीला एकटं टाकून तो तिथून पळून गेला.

मुलीच्या आईने आपली मुलगी घरात दिसत नाही म्हणून तिला हाका मारायला आणि शोधायला सुरूवात केली. त्यावेळी तिला मुलीच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा तिने शेजारी असलेल्या युवकाच्या घरात जाऊन पाहिलं.. तर तिथे तिला तिची मुलगी मोठ्या रडताना दिसली तसंच तिच्या गुप्तांगातून रक्त येत होतं हे देखील मुलीच्या आईने पाहिलं. त्यानंतर या मुलीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या मुलीवर बलात्कार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसंच या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही दिली.

पोलिसांनी आरोपी युवकाबाबत काय सांगितलं?

आरोपी युवक पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला आहे. आम्ही त्याच्या शोधासाठी दोन पथकं तयार केली आहेत. पीडित मुलीवर सध्या सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in