तीन गोळ्या आणि तंदूरच्या भट्टीत टाकला मृतदेह, कसं घडलं होतं दिल्लीतील नयना सहानी हत्याकांड?

पती सुशीलच्या डोक्यात कल्पना आली आणि त्याने पत्नी नयनाचा मृतदेह थेट तंदूर भट्टीतच टाकला
तीन गोळ्या आणि तंदूरच्या भट्टीत टाकला मृतदेह, कसं घडलं होतं दिल्लीतील नयना सहानी हत्याकांड?

नव्वदच्या दशकात दिल्लीत अशी एक खळबळजनक घटना घडली होती की ज्यामुळे दिल्ली नाही तर पुर्ण देशच हादरुन गेला होता. मानवी क्रौर्याच्या परिसीमा गाठणारी ही घटना नंतर अनेक दिवस चर्चेचा विषय बनली. दिल्लीतले टिपिकल राजकीय वातावरण, सत्तेची धुंदी, पैसा, प्रेम, सूड, संशय असे अनेक अँगल या घटनेला होते. तेव्हा दिल्लीत घडलेल्य़ा तंदूर हत्याकांडाची घटना नेमकी काय होती त्याचा आढावा आजच्या लेखात घेऊयात.

दिल्लीच्या टिपीकल राजकीय वातावरणात वाढलेला कॉँग्रेसच्या युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष सुशील शर्मा आणि त्याच्यासोबत काम करणारी कॉँग्रेसची महिला कार्यकर्ता नयना साहनी. दोघंही एकाच संघटनेत काम करत असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झालं. पुढे जाऊन दोघांनीही लग्न केलं. परंतू लग्नानंतर एका जीवलग मित्रावरुन नयना आणि सुशील यांच्यात संशयाचं वातावरण सुरु झालं ज्यातून पुढे अंगावर शहारे आणणारं हत्याकांड घडलं.

लग्नाच्या आधीपासून नयना, सुशील आणि मतलुम करीम या तिघांमध्ये चांगली मैत्री होती. परंतू लग्नानंतर सुशील आणि नयनाच्या संसारात संशयाच्या भुताने प्रवेश केला. सुशीलला असा संशय होता की नयना आणि त्याचाच मित्र मतलुम यांच्यात अफेअर सुरु आहे. खरं तर मतलुम हा सुशीलचाही मित्र होता. तो देखील काँग्रेसच्या संघटनेत काम करत होता. परंतू संशयाच्या पिशाच्चाने एकदा तुम्हाला झपाटलं की ते तुमची पाठ सोडत सोडत नाही. या घटनेतही काहीसं असचं झालं.

एक दिवस सुशील शर्मा संध्याकाळी अचानक घरी आला. सुशील घरी आला तेव्हा नयना कोणाशीतरी फोनवर बोलत होती. सुशील अचानक घरी आल्यामुळे नयना थोडीशी दचकली आणि तिने फोन ठेवून दिला. नेहमीप्रमाणे यामुळे परिणाम उलटाच झाला, सुशीलचा संशय अजूनच बळावला. नयना दुसऱ्या खोलीत निघून गेल्यावर सुशीलने त्याच लँडलाईनवरुन नंबर रिडायल केला आणि कॉल लागला तो नेमका मतलुम करीमला.

आधीच मतलुम वरुन सुशीलच्या मनात संशय होता आणि आता तर हे आयतं कोलीतच त्याच्या हातात मिळालं. तेव्हा सुशील आणि नयना यांच्यात कडाक्याचे भांडण झालं. हे भांडण विकोपाला गेलं आणि जे घडायला नको ते घडलं.

सुशीलकडे परवाना असलेले एक पिस्तुल होतं. त्या पिस्तुलातून सुशीलने नयनावर 3 गोळ्या झाडल्या. एक गोळी नयनाच्या मानेत, एक गोळी नयनाच्या डोक्यात तर एक गोळी छतात शिरली. नयना जागेवरच ठार झाली आणि घरात रक्ताचं थारोळं झालं. थोड्या वेळाने राग ओसरल्यानंतर... डोकं थंड झाल्यानंतर सुशील भानावर आला आणि त्याला कळलं की आपण काय करुन बसलो आहोत ते. पण तोपर्यंत अर्थातच वेळ निघून गेली होती. यापुढे मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न सुशीलसमोर होता आणि त्यातून पुढे सुरु झाला नयनाच्या मृतदेहाच्या विटंबनेचा क्रुर प्रवास.

सुशील शर्माने घर साफ करायला सुरुवात केली, रक्त पुसलं, भिंती पुसल्या आणि नयनाचा मृतदेह हा प्लस्टिकच्या एका बॅगमध्ये भरला. संध्याकाळचे आठ- साडेआठ वाजले होते. दिल्लीतली पावसाळी संध्याकाळ होती. रस्ताही सामसुम होता. मृतदेह सुशीलने त्याच्या गाडीत कोंबला आणि गाडी घेऊन तो दिल्लीच्या रस्त्यावर फिरु लागला. नैनाच्या मृतदेहाचं काय करायचं याचा विचार करुन सुशीलच्या डोक्याचा भुगा झाला होता. शेवटी सुशीलने मनाशी काहीतरी ठरवत गाडी त्याच्याच बगीचा नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये वळवली.

त्यावेळी हॉटेलमध्ये लोकं जेवत होती. रात्रीचे दहा-साडेदहा वाजले असतील. हॉटेलचा मॅनेजर केशव सुशीलला सामोरा गेला. सुशीलने मॅनेजरला हॉटेल बंद करायला सांगितले. लोकं जेवत असल्यामुळे असं लगेच हॉटेल बंद करण शक्य नव्हतं. तसचं मॅनेजर केशवला मालक अचानक हॉटेल बंद करायला का सांगत आहेत हे काही कळत नव्हतं. परंतू शेवटी केशवला मालकाचं ऐकावंच लागलं. केशवने हॉटेलचं शटर खाली ओढलं आणि एक-एक करुन गिऱ्हाईक आणि सर्व कर्मचाऱ्यांना हॉटेलबाहेर काढलं.

हॉटेलमधून सर्वजण बाहेर गेल्यानंतर सुशीलने केशवला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. ही गोष्ट ऐकताच केशवच्या पायाखालची जमीनच सरकली. नयनाच्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी तिला तंदूर भट्टीत टाकावं लागेल असं सुशीलने सांगितलं. शेवटी नयनाची बॉडी हॉटेलमध्ये आणून तंदूरमध्य़े कोंबण्यात आली. खरं सुशीलच्या हॉटेलमध्ये तंदूरची भट्टी ही मोठी होती पण तरीही नयनाची बॉडी त्यामध्ये कोंबण्यात आली. भट्टी पेटलेलीच होती, पण बॉडी काही जळत नव्हती.

याच भट्टीत नयनाचा मृतदेह टाकण्यात आला
याच भट्टीत नयनाचा मृतदेह टाकण्यात आला

बॉडी जाळण्यासाठी हॉटेलात पडलेले कागद, बॅनर, लाकडं टाकण्यात आली तरीही काही केल्या बॉडी जळत नव्हती. शेवटी हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी जे बटर वापरतात ते बटर बॉडीवर टाकण्यात आलं. त्याने फक्त भडका उडाला....असं करता करता शेवटी हॉटेलमध्ये जेवढे बटरचे बॉक्स होते ते सगळे तंदूरच्या भट्टीत ओतण्यात आले. त्यामुळे झालं असं की या भट्टीचा एकदम मोठा असा भडका उडाला आणि हॉटेलच्या छताला आग भिडली. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा दिल्ली पोलिसांमध्ये कार्यकरत कॉन्स्टेबल अब्दुल कुल्लू या भागात गस्त घालत होते. त्यांना ही आग दिसली आणि नेमकं सुरु तरी काय आहे हे पाहण्यासाठी ते हॉटेलमध्ये आले.

सुशील शर्माला हे कळताच त्याने कॉन्स्टेबलला गाठलं आणि त्याला थातुरमातुर उत्तर देऊन हॉटेलच्या बाहेर काढलं. परंतू पोलिसाचं समाधान झालं नाही. अजूनही तंदूरच्या भट्टीतली आग जळतंच होती. पोलीसाचा संशय बळावला आणि हॉटेलच्या मागच्या भितींवरुन उडी मारुन कॉन्स्टेबल पुन्हा आत आला. तंदूर भट्टीकडे गेला असता त्या कॉन्स्टेबलला भट्टीत मांसासारखं काहीतरी जळताना दिसलं. पुढे जाऊन नीट निरखून पाहिलं असता एका व्यक्तीचा हात असल्याचं कॉन्स्टेबलला लक्षात आलं.

यानंतर दिल्लीत तंदूर हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुशीलने घटनास्थळावरुन पोबारा केला होता परंतू केशव पोलिसांच्या हाती लागला. मतलुम करीमला याविषयी माहिती पडताच त्याने पोलिसांशी संपर्क साधून तंदूर भट्टीत मिळालेला मृतदेह हा हातातल्या अंगठीवरुन नयनाचाच असल्याचं ओळखलं. ज्यानंतर अधिक तपास केला असता दिल्ली पोलिसांना ही हत्या सुशीलनेच केल्याचं समजलं.

इकडं फरार झालेला सुशील शर्मा हा बंगलोरला गेला. वेशांतर केलं पण तेव्हाच त्याने बंगलोरच्या कोर्टात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला. दिल्ली पोलीसांना याचा सुगावा लागताच त्यांनी तातडीने सुत्रं हलवली आणि सुशीलला ताब्यात घेऊन दिल्लीला आणलं. नंतर केस कोर्टात चालली. सत्र न्यायालयाने सुशीलला फाशीची शिक्षा सुनावली तर केशवला 7 वर्षाची जन्मठेप सुनावली. नंतर केस हायकोर्टात गेली. मधल्या काळात 18 वर्ष निघून गेली होती.

दिल्ली पोलिसांच्या अटकेत असलेला सुशील
दिल्ली पोलिसांच्या अटकेत असलेला सुशीलफाईल फोटो

2013 मध्ये हायकोर्टाने सुशील शर्माची फाशीची शिक्षा रद्द करुन त्याला जन्मठेप सुनावली. 2 वर्षानी सुशील शर्माने पॅरोलसाठी अर्ज केला, तोपर्यंत त्याने जवळपास 20 पेक्षा जास्त वर्षांची शिक्षा भोगली होती. तुरुंगातून सुटल्यावर सुशील शर्माने त्याचे नाव बदलंलं नॉर्मल आयुष्य तो जगू लागला. परंतू आजही या घटनेचा उल्लेख निघाला की अनेक दिल्लीकरांच्या जुन्या आठवणी जागा होतात.

Related Stories

No stories found.