पुण्यात गँगवार भडकणार? गजा मारणे प्रकरणात पोलिसांचा ‘तो’ रिपोर्ट का चर्चेत?
gaja marne latest news : गजानन मारणेला न्यायालयात जामीन मिळाला, पण पोलिसांच्या एका रिपोर्टची चर्चा सुरू आहे आणि काही प्रश्न उपस्थित झालेत.
ADVERTISEMENT

गजा मारणे आणि दहशत, यापेक्षा आता गजा मारणे वाद असं समीकरण झालंय. पण यावेळी गजा मारणेच्या सुटकेला राजकीय अँगलही असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याची चर्चा जोर पकडू लगालीय. गजा मारणेच्या जामिनावर झालेल्या या सुटकेनंतर आता काय वाद होतेय? ज्या प्रकरणात गजा मारणेला जामीन मिळाला ते प्रकरण काय? त्याचबरोबर पुन्हा एकदा पुण्यात गँगवॉर पेटणार का आणि गजा मारणेला सोडवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप आहे का? हेच समजून घेऊयात…
गजानन मारणे उर्फ गजा मारणेची 3 एप्रिलला जामिनावर सुटका झाली. पण या सुटकेमागे राजकीय हात असल्याचं बोललं जातंय. गजा मारणे याच्याविरोधात पुणे शहरासह जिल्ह्यात सुमारे 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मोक्का अंतर्गत गजावर कारवाई झाली आहे. असं असलं तरी इतर गुन्ह्यांप्रमाणे याही गुन्ह्यात गजा मारणेची पुरेशा पुराव्याअभावी सुटका झाली आहे. यावरुनच कॉण्ट्रोव्हर्सीला सुरुवात झालीय.
गजा मारणेला जामीन… चर्चा होण्याचं कारण काय?
गजा मारणे फेब्रुवारी २०२१ ला येरवडा तुरुंगातून सुटला त्यावेळी त्याची जंगी मिरवणूक निघाली होती. त्यावेळी ३०० गाड्यांचा ताफा एक्स्प्रेस हायवेवर होता. ज्यामुळे एक्स्प्रेस हायवे जाम झाला होता. यावरुनही गजाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गजाची ज्या प्रकरणातून सुटका झाली, हे प्रकरण साधारण त्यानंतरचंच आहे.
पुण्यातील एक व्यावसायिक आणि शेअर दलालाचं अपहरण गजा मारणेच्या टोळीने केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मारणे टोळीने मागितली होती. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी मारणे टोळीने केली होती.