छत्रपती संभाजीनगरमधील नराधमाला दुबईतून अटक, लैगिंक शोषण अन् 19.73 लाखांची लूट

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधील लैंगिक शोषण आणि 19.73 लाखांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी दुबईतून अटक केली. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगरमधील नराधमाला दुबईतून अटक

point

लैगिंक शोषण अन् 19.73 लाखांची लूट

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये लैंगिक शोषण आणि 19 लाख 73 हजार रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी दुबईतून अटक करून भारतात आणले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परदेशात पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी महाराष्ट्र सीआयडी, सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि इंटरपोलच्या मदतीने तपास केला. आरोपीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीसच्या आधारे आरोपी संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोहम्मद माजीन अब्दुल राशीद शेख (वय 32) असं अटक करण्यात आलेल्या नराधमाचं नाव आहे. यूएई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे पथक दुबई येथे गेले आणि दोन दिवसांपूर्वी आरोपीला ताब्यात घेऊन भारतात आणले. सध्या त्याच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणात एकूण चार तक्रारदार 

या प्रकरणात 1 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य तक्रारदार महिलेने लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. याशिवाय अन्य तीन जणांनीही आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणात एकूण चार तक्रारदार आहेत. त्यापैकी केवळ एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण तीन आरोपींना नामनिर्देशित केले असून, मुख्य आरोपीला आता दुबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 आणि फसवणुकीशी संबंधित कलम 318(2) यासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : सिराजला वगळल्याने रणकंदन; रवी शास्त्री, गावस्कर भडकले, तर काँग्रेस खासदाराच्या आरोपाने वादाला राजकीय रंग

पोलिसांच्या तपासात आतापर्यंत एकूण 19 लाख 73 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 29 जानेवारी 2026 रोजी प्राथमिक आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी परदेशात गेल्याने त्याला भारतात आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सुरुवातीला त्याच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस सीआयडी, पोलीस महासंचालक कार्यालय, सीबीआय, महाराष्ट्र गृह विभाग, केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या समन्वयातून आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. दुबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याला भारतात आणले. आता पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपीची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्त पंकज अतुकर यांनी या कारवाईची माहिती दिली. या आरोपीविरोधात आणखी काही नागरिक तक्रार दाखल करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या आरोपीकडून कोणाची आर्थिक फसवणूक झाली असेल किंवा कोणाचे शोषण झाले असेल, तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अतुकर यांनी केले आहे. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परदेशातून आरोपीला अटक करून भारतात आणण्याची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई असल्याचा दावा पंकज अतुकर यांनी केला. आरोपीची कोठडी मिळाल्यानंतर त्याच्याकडून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता पोलिसांचे लक्ष आहे.