डोंबिवली हादरली.. बंदूक, खंजीर अन् बरंच काही.. ऐन निवडणुकीआधी 'ही' नेमकी कसली तयारी?
Dombivli Crime: ऐन निवडणुकीआधी डोंबिवलसारख्या शहरात मोठा शस्त्रासाठा सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

डोंबिवली: आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 ने चार दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील देसले पाडा येथील गोकुळधाम टॉवर येथील एका फ्लॅटवर छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रांचा साठा जप्त केला. या कारवाईत, गुन्हे शाखेने 36 वर्षीय सराईत गुन्हेगार रोशन झा याला अटक केली.
नेमकी कोणकोणती शस्त्र पोलिसांनी केली जप्त?
छाप्यादरम्यान पोलिसांनी 2,12,500 रुपयांची बेकायदेशीर शस्त्रे जप्त केली, ज्यात 3 देशी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, 2 रिकामे मॅगझिन, 2 खंजीर, 4 धारदार चाकू आणि 1 तलवार यांचा समावेश आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात रोशन झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीकडे अजूनही शस्त्रे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस अधिक तपास करत आहे.
हे ही वाचा>> डान्सबारमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत त्याचा विवाह, पत्नीवर लक्ष ठेवायला घरात बसवले सीसीटीव्ही, पोलिसही चक्रावले
कल्याण गुन्हे शाखेचे पोलिसकर्मी दत्ता भोसले यांना डोंबिवलीतील देसले पाडा येथील गोकुळधाम टॉवरमधील एका फ्लॅटमध्ये बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री पटल्यानंतर, गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने तात्काळ छापा टाकून कारवाई केली. काही दिवसांवर महापालिका निवडणुका येत असल्याने, डोंबिवलीतील एका फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडणे हा पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची आहे. ही शस्त्रे कोणत्याही राजकीय नेत्याशी किंवा आगामी निवडणुकांशी संबंधित आहेत का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.










