नागपूर हादरलं, आईने काकासोबत पळून जाऊन लग्न केलं, मुलाच्या जिव्हारी लागलं, चुलत्याला क्रूरपणे संपवलं
Nagpur Crime : नागपूर हादरलं, आईने काकासोबत पळून जाऊन लग्न केलं, मुलाच्या जिव्हारी लागलं, चुलत्याला क्रूरपणे संपवलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपूर हादरलं, आईने काकासोबत पळून जाऊन लग्न केलं
मुलाच्या जिव्हारी लागलं, चुलत्याला क्रूरपणे संपवलं
Nagpur Crime : नागपूरच्या पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडलेल्या एका भयावह घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वाद आणि नात्यांतील गुंतागुंतीमुळे पुतण्याने स्वतःच्या काकाचा खून केल्याची घटना तलमले वाडी भागात उघडकीस आली. मृताचे नाव गोमा कृष्णराव कुंभारे (वय 42, रा. गंगाबाग कॉलनी, पारडी) असून आरोपी पुतण्याचे नाव कुणाल देवेंद्र कुंभारे (वय 22, रा. नाईक तलाव, पाचपावली) असे आहे.
तरुणाने चुलत्याला घाटात गाठलं, चाकूने वार करुन संपवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणालच्या आईने आपल्या पतीच्या भावाशी म्हणजेच दिराशी गोमा कुंभारे यांच्याशी पळून जाऊन विवाह केला होता. या घटनेमुळे कुणालच्या मनात तीव्र राग आणि द्वेष निर्माण झाला. वडिलांसोबत राहणारा कुणाल आपल्या काकालाच आपल्या आयुष्याच्या उध्वस्त होण्यास कारणीभूत मानत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच तणाव निर्माण होत असे. घरातील या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांमुळे वारंवार वाद होत, आणि कुणालने अनेकदा “तुला सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी (6 नोव्हेंबर) दुपारी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. सायंकाळी कुणाल आपल्या मित्र अमित भारतीसोबत पारडी परिसरात आला. घरात काका दिसले नाहीत म्हणून तो तलमले वाडी भागातील घाटाजवळ गेला, जिथे गोमा कुंभारे काही कामानिमित्त गेले होते. तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात कुणालने खिशातून चाकू काढून काकाच्या छाती, मान व पोटावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने गोमा कुंभारे जागीच कोसळले.
घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या गोमा यांना भवानीनगर रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. खून केल्यानंतर आरोपी कुणाल आणि त्याचा मित्र घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं.










