Pune: पाणी प्यायला गेला अन् पोलिसांना सापडला, नराधम दत्तात्रय गाडेच्या अटकेची Inside Story
ड्रोन, स्निफर डॉग आणि पोलिसांच्या 13 पथकांना चकमा देणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेर पहाटे पोलिसांनी त्याला अटक केली.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय रामदास गाडेला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला पुण्याच्या शिरूरमधून पहाटे 1.30 वाजता अटक केली आणि आज (28 फेब्रुवारी) त्याला पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी गाडेने मंगळवारी पहाटे तरुणीवर बलात्कार केला होता ज्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 13 पथके तयार केली होती आणि त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.
आरोपी गाडे शिरूर तालुक्यातील एका शेतात लपून बसला होता. कालपासून पुणे पोलिसांची 13 पथके त्याचा शोध घेत होती. शिरूर तालुक्यातील त्याच्या गावीही पोलिसांनी छापा टाकला होता. रात्री 12 वाजताच्या सुमारास, गाडे याने गुनाट गावातील एका घराचा दरवाजा ठोठावला आणि पाणी मागितले. त्याला भूक लागली होती. त्यामुळे त्याने पाणी पिऊन तो अन्नाच्या शोधात निघाला. त्याच वेळी खबऱ्याने त्याच्याबद्दलची नेमकी माहिती पोलिसांना दिली.
हे ही वाचा>> Pune : स्वारगेट केसमधील आरोपी फरार? पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस, राष्ट्रीय महिला आयोगनं घेतली दखल
आरोपीला पकडण्यासाठी ड्रोनचाही वापर
डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला गावाजवळील एका शेतातून शोधून काढलं. गुरुवारीच पोलिसांनी आरोपी हिस्ट्रीशीटरची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एवढेच नाही तर आरोपीला पकडण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली.
आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय 37 वर्ष) हा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, दरोडा आणि चेन स्नॅचिंगच्या अर्धा डझन प्रकरणांमध्ये हवा आहे. तो 2019 पासून जामिनावर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गुनाट गावातील उसाच्या शेतात ड्रोन आणि श्वान पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबवली आणि या दरम्यान 100 हून अधिक पोलिस गावात पोहोचले होते.










