ज्यांनी लहानाचं मोठं केलं, त्यांचीच हत्या; सख्ख्या भावांनी आई-वडिलांना का संपवलं?
गाझियाबादमध्ये दोन सख्ख्या भावांनी आपल्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. मालमत्तेच्या वादावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्यांनी लहानाचं मोठं केलं, त्यांचीच हत्या
सख्ख्या भावांनी आई-वडिलांना का संपवलं?
Crime News : गाझियाबाद येथील क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमत्तेच्या वादातून सोमवारी (20 जुलै) रात्री आई-वडिलांची निघृण हत्या करणाऱ्या ललित आणि दीपक उर्फ विकी या दोन भावांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई-वडिलांची क्रूरपणे हत्या
पोलीस चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येच्या वेळी लहान मुलगा ललित अधिक आक्रमक झाला होता. सोमवारी रात्री त्याने सर्वप्रथम आपले वडील गंगाशरण यांच्यावर हल्ला केला. त्याने आधी टॉवेलने वडिलांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांचे डोके भिंतीवर आदळले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या आई विमलेश यांनाही त्याने सोडले नाही; त्यांचाही टॉवेलने गळा आवळून आणि तोंड दाबून खून केला. या संपूर्ण घटनेदरम्यान मोठा भाऊ दीपक उर्फ विकी तिथेच उपस्थित राहून त्याला मदत करत होता.
हे ही वाचा : DNA रिपोर्टने उलगडा, सख्खा भाऊ निघाला बाळाचा बाप, निर्दोष तरुणावरील गुन्हा कोर्टाने केला रद्द
मालमत्तेवरुन वाद, रागीट स्वभाव
चौकशीत ललितचा स्वभाव अत्यंत रागीट असल्याचे आणि गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबात मालमत्तेवरून सतत वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान दोन्ही भावांनी आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला असला, तरी पोलीस या प्रकरणाच्या इतर सर्व बाजूंचा सखोल तपास करत आहेत. बुधवारी मृत गंगाशरण यांच्या घरी नातेवाईक आणि परिचितांची रीघ लागली होती, तर सर्वत्र शोक आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
हे ही वाचा : पोलिसांचा ड्रग्जप्रकरणी 'तो' व्हिडिओ, राज ठाकरेंनी धरलं धारेवर
गंगेत अस्थी विसर्जित
गंगाशरण आणि त्यांची पत्नी विमलेश यांना चार मुले होती. दोन मुलगे आणि दोन मुली. त्यांनी मोठ्या मुलाचे नाव दीपक व मोठ्या मुलीचे नाव दीपिका, तर लहान मुलाचे नाव ललित व लहान मुलीचे नाव ललिता ठेवले होते. परंतु, सोमवारी रात्री ज्या दोन्ही मुलांना त्यांनी लहानाचे मोठे केले, त्याच मुलांनी त्यांची जीवनयात्रा संपवली. बुधवारी दोन्ही मुलींनी अत्यंत जड अंतःकरणाने आई-वडिलांच्या अस्थी ब्रजघाट येथे नेऊन गंगेत विसर्जित केल्या.
