Ajit Pawar: 'मला पळपुटेपणा आवडत नाही...' अजित पवारांची सडेतोड मुलाखत जशीच्या तशी!
Ajit Pawar Interview: अजित पवार यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पवारांबाबत नेमकी काय केली विधानं.. वाचा अजित पवारांची संपूर्ण मुलाखत
ADVERTISEMENT
Ajit Pawar Exclusive Interview: साहिल जोशी / राजदीप सरदेसाई, बारामती: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये बारामती हा सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ असून आहे. कारण इथे पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे. शरद पवार आणि अजित पवारांसाठी ही निवडणूक अत्यंत अवघड आहे. याचबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (20 एप्रिल) मुंबई Tak ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. (lok sabha election 2024 ajit pawar exclusive interview as it is see what they said about sharad pawar supriya sule)
ADVERTISEMENT
या मुलाखतीत अजित पवार यांनी शरद पवारांच्या अनेक आरोपांना उत्तरं दिली आहेत. याशिवाय त्यांनी नेमकं काय-काय म्हटलं हे जाणून घेण्यासाठी वाचा अजित पवारांची संपूर्ण एक्स्क्लुझिव्ह मुलाखत.
अजित पवारांची सडेतोड मुलाखत जशीच्या तशी..
प्रश्न: तुम्ही 1991 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली. तुमच्या दृष्टीने 2014 ची निवडणूक कठीण होती की आताची निवडणूक?
हे वाचलं का?
अजित पवार: माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर 1999 सालची विधानसभेची निवडणूक माझ्यासाठी कठीण होती. लोकसभेचं बोलायचं म्हटलं तर ज्यावेळेस जबरदस्त मोदींची लाट आली.. ती 2014 सालची निवडणूक.. कारण शहरी भागातील लोकं, सुशिक्षित वर्ग हे कोणी ऐकायलाच तयार नव्हते. ते फक्त मोदी-मोदी.. एवढंच करत होते. त्यामुळे लोकसभेचा विचार करता ती निवडणूक महत्त्वाची होती.
विधानसभेचा विचार करता 1999 साली माझ्याविरोधात सर्वांनी मिळून एकच उमेदवार उभा केला होता. ती निवडणूक माझ्या दृष्टीने महत्त्वाची होती.
ADVERTISEMENT
प्रश्न: बारामतीचा बिग बॉस कोण.. अजित पवार की शरद पवार?
ADVERTISEMENT
अजित पवार: मला असं काही वाटत नाही.. कारण निवडणुका म्हटल्यावर आतापर्यंत अनेक ठिकाणी एका कुटुंबातील लढती झाल्याचं आपण महाराष्ट्रात आणि देशातही पाहिलं आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी वि. राहुल गांधी अशी आहे. कारण इथून निवडून आलेला खासदार तिथे जाऊन कोणाला पाठिंबा देणार आहे त्याबाबत लोकांनी विचार करायचा आहे.
आज देशातील विचार केल्यास मोदी साहेबच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.. कोणी किती काही म्हटलं तरी.. त्यामुळे आमचं मत असं आहे की, आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. आम्ही शिव शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारावरच पुढे चाललो आहोत. परंतु कधीकधी राजकीय जीवनात काही पुढे-मागे सरकावं लागतं.. काही निर्णय घ्यावे लागतात.
ते विकासपुरुष असल्यामुळे आणि त्यांनी जे काही व्हिजन 10 वर्ष दाखवलं.. ते डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण आमच्यावर आरोप करतात की, यांनी सेक्युलर विचारधारा सोडली. मला सांगा.. सगळ्यात हिंदुत्ववादाचा जातीय कट्टर चेहरा हा शिवसेना होता.. बाळासाहेबांची अनेक भाषणं तुम्ही ऐकली आहेत. ती भाषणं बघितल्यानंतर कालपर्यंत म्हणजे आम्ही अडीच वर्ष त्यांच्यासोबत सरकारमध्ये काम करत होतो तरीही उद्धव ठाकरे हे 'माझ्या हिंदू बांधवानो-भगिनी आणि मातांनो..' असंच म्हणायचे..
मी अडीच वर्ष त्यांच्या बरोबर काढल्यामुळे मी त्यांना विचारलं होतं की, साहेब आपण सेक्युलर विचार का करत नाही? तमाम माझ्या बंधू-भगिनी आणि तरूण मित्रांनो असं म्हटलं तर त्यात सगळेच आले.. म्हणजे मी म्हटलं होतं तसं..
ते म्हणाले की नाही अजित.. माझी काही भूमिका आहे मी ती भूमिका काही सोडणार नाही.. आपलं सरकार बनवत असताना ठरलं होतं.. ज्यामधून आपले मतभेद होतील असे विषय आम्हीपण आणायचे नाही तुम्हीप आणायचे नाही.. सरकार लोकांच्या भल्याकरिता चालवायचं.. ते आम्ही चालवलं.
प्रश्न: शरद पवार यांचं म्हणणं आहे की, सेक्युलररिझमचा वाद नाही.. खरा वाद हा जो आहे अजितदादा किंवा इतर ज्यांनी पक्ष फोडला.. त्यांना भीती होती की.. ईडी त्यांना टार्गेट करतंय.. अमित शाह यांनी तुमच्यावर प्रेशर टाकलं.. असं पवार साहेबांचं म्हणणं आहे..
अजित पवार: ते म्हणतील तेच खरं का? आम्ही तुम्हाला सांगतोय की, असं नाही.. शेवटी आम्ही सगळे जणं 80 टक्के आमदार हा निर्णय घेतात.. खरं तर 100 टक्के आमदारांनी निर्णय घेतला होता. ज्यावेळेस सरकार पडतंय असं झाल्यानंतर.. सगळ्यांनी सहीचं पत्र दिलं होतं. त्यावेळेस साहेबांना.. की, आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. 2022 मध्येच.. शिंदे साहेबांचं सरकार व्हायच्या आधी..
ते पत्र वाचल्यानंतर साहेबांनी सांगितलं प्रफुल पटेल, जयंत पाटील, अजित पवार असं तिघांनी जाऊन अमितभाईंशी चर्चा करावी आणि पुढचा निर्णय घेऊन टाकावा.. असं त्यांनीच सांगितलं होतं..
पत्र वाचल्यावर.. ते म्हणाले होते की, सगळ्यांची ही मानसिकता असेल तर तुम्ही तिघं जाऊन चर्चा करा आणि सरकार बनविण्याबाबत बोला.. तेव्हा शिंदे हे सूरतला होते.. ते गुवाहटीला देखील गेले नव्हते.. सूरतच्या पहिल्या टप्प्यातच..
आता उपमुख्यमंत्र्यांचं ऑफिस आहे देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्या कॉन्फरस हॉलमध्ये आम्ही बसलो.. तेव्हा NCP च्या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांनी सह्या केल्या होत्या. ते पत्र घेऊन राजेश टोपे घेऊन गेले.
आता ईडीचा प्रश्न कोठे येतो.. सगळ्यांचं म्हणणं होतं की, आपआपल्या भागात विकासाची कामं करण्याकरिता आपण सरकारमध्ये असणं जास्त उपयुक्त ठरेल.. जर आपण शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आपण भाजपसोबत जाऊ शकतो. असं म्हणून तो निर्णय झाला.
2014 ला बाहेरुन पाठिंबा.. 2017 ला पण झालं. त्यात मी नव्हतो. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. सुनील तटकरे आणि साहेब दिल्लीला गेले.. तिथे चर्चा झाली.. चर्चा होत असताना दिल्लीने सांगितलं की, शिवसेना हा आमचा मित्र पक्ष आहे.. आम्ही शिवसेनेला सोडू शकत नाही. त्यामुळे शिवसेना आम्ही आणि तुम्ही असं तिघांनी.. तेव्हा साहेबांनी सांगितलं की, आपण तिघं सरकार बनवू शकत नाही. तुम्ही शिवसेनेला बाहेर काढा.. तर मी भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार करेन. ते सरकार करत असताना अमितभाईंनी सांगितलेलं की, आम्ही आता त्यांना बाहेर काढू शकत नाही. आम्ही त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल.
उद्या जर त्यांना तिघांचं सरकार आवडलं नाही आणि ते जर बाहेर पडले तर गोष्ट वेगळी.. पण साहेबांनी सांगितलं की, असं असेल तर आम्ही सरकारमध्ये येणार नाही. शिवसेना बाहेर काढा तर आम्ही तुमच्यासोबत येऊ.. ही 2017 ची गोष्ट..
प्रश्न: तुमचं हे म्हणणं असलं तरी पवार म्हणतात की, 'मी भाजपसोबत गेलो का?'
अजित पवार: मी सांगितलं ना.. 2017 ला त्यांनी अट घातली शिवसेनेला बाहेर काढा.. भाजपने ते मान्य केलं नाही म्हणून गेलो नाही. 2014 ला कोणीच विचारलं नव्हतं. मतमोजणी सुरू असतानाच टीव्हीवर आलं की, कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला.
वानखेडेवर कोणाला परवानगी दिली जात नाही. तेव्हा साहेब प्रमुख होते. पण मोदीसाहेब हे शपथविधीला येणार म्हणून पहिल्यांदा वानखेडे हे शपथविधीसाठी देण्यात आलेलं. 2014 ला वानखेडेवर शपथविधी झाला. आम्हाला सांगण्यात आलं की, तुम्ही सगळ्यांनी शपथविधीला जायचं. भुजबळ साहेब, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आम्ही सगळे प्रमुख शपथविधीला हजर होतो.
आम्हाला तेव्हा सांगण्यात आलेलं की, आता शपथविधी होईल.. त्यानंतर चर्चा होऊन आपण सरकारमध्ये सामील व्हायचं. असं आम्हाला सांगितलं होतं.. आम्ही काय.. वरिष्ठ सांगतील ते ऐकायचो.
प्रश्न: 2019 साली तर तुम्ही गेलाच ना.. पण त्यावेळी तुम्ही शपथ घेणार याबाबत पवार साहेबांना माहिती होतं की नाही.. याबाबत चर्चा सुरूच आहेत.
अजित पवार: आता आपण आहोत 2024 मध्ये.. 2019 चं कुठं उकरत बसता.. देवेंद्रजींनी पण बऱ्याचदा सांगितलं आहे.. कुठे चर्चा झाली, कुणाच्या उद्योगपतीच्या बंगल्यात.. पाच-सहा बैठका झाल्या.. ते बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे.
प्रश्न: तुमच्यावर दबाव टाकला अमित शाह किंवा दिल्लीने.. तुमच्या पत्नीने निवडणूक लढविण्याचा निर्णय हा बारामतीत नाही तर दिल्लीत झाला.. असं म्हटलं जात आहे.
अजित पवार: हे धादांत खोटं आहे.. आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्यात आम्ही कोण उमेदवार द्यायचा ते आम्ही ठरवणार.. मी ज्यावेळेस चाचपणी केली त्यावेळेस इतर उमेदवारांची चाचपणी करायला लागलो तेव्हा बारामतीकरांकडून असं पुढे आलं की, इथे जर लोकसभेला सुप्रिया ताईंचा विचार करू आणि विधानसभेला दादांचा विचार करू. पण मला ते नको होतं..
त्यामुळे शेवटी हे उमेदवार द्यावा लागला. त्यात मला कुणीही सांगितलं नाही. हा माझा निर्णय आहे. मी पक्षात सहकाऱ्यांशी बोललो की, ही जागा जर जिंकायची असेल तर आपल्याला हा उमेदवार द्यावा लागेल. तो उमेदवार दिला तरच यश मिळेल..
मी लढतोय असा 100 टक्के लोकांमध्ये मेसेज जाईल.. म्हणूनच मी डमीचा फॉर्म देखील भरला. मी ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं ही माझी पद्धत नाही. मी जे बोलतो ते खरं बोलतोय.. मी डमी पण फॉर्म भरला.. जर यदाकदाचित काही कारणाने फॉर्म अडचणीत आला तर मीच उमेदवार असणार आहे.
प्रश्न: तुमचे कौटुंबिक नातं आहे.. ते संबधं तेव्हा तुटतात की, जेव्हा सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार.. जर दुसरा कोणी उमेदवार असता तर एवढी इमोशनल लढाई झाली नसती..
अजित पवार: हे बघा तुम्ही मीडियाने फार वरपर्यंत नेली आहे. त्याला काही अर्थ नाही. अनेक निवडणुका असतात तशीच ही निवडणूक आहे. त्यावेळेस मीडिया अॅक्टिव्ह नव्हता. आमच्या घरातील एक निवडणूक झालीच ना.. आमच्या घरातले आबांच्या नंतर सगळ्यात थोरले काका.. ज्यांच नाव होतं वसंतराव पवार. ते प्रख्यात वकील होते. इथे शेकापचं वर्चस्व होतं. अख्खं घराणं शेकापचं होतं.
शेकापचे दादा असताना.. साहेब सख्खे धाकटे भाऊ.. तरी साहेबांनी विरोधात काम केलं. अख्खं घर शेकापचं काम करत होतं. एकटे पवार साहेब हे काँग्रेसचं काम करत होते.
प्रश्न: तुम्ही शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला का? की हे मला पटत नाही.. आपण एकत्र येऊ म्हणून...
अजित पवार: एकंदरीत काम करताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पुढे जातो. आज तुम्ही बारामती पाहिली तर कळेल.. कुठल्याही बारामतीतील सर्वसामान्य माणसाला विचारा की, 1967 ते 1990 पर्यंत बारामतीचा काय विकास झाला आणि 1990 पासून ते आजपर्यंत काय विकास झाला.
मी खरोखरीच सकाळी 6 वाजेपासून काम करणारा कार्यकर्ता आहे. रात्री किती उशीर झाला तरी मी काम करत असतो. मला कामाची आवड आहे. आज देशपातळीवर ज्या पद्धतीने काम केलंय.. आम्ही सुद्धा मोदी साहेबांना 2014, 2019 ला विरोध केला. परंतु इतर पंतप्रधानांचा विचार केला तर आम्हाला आज देशात जी कामं झाली किंवा चालली आहेत ती देशाच्या दृष्टीने जास्त योग्य वाटतात..
मी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 8 वेळा सादर केलाय. मला माहितीए की, आपलं किती बजेट आहे. तर केंद्राचं बजेट तर किती तरी पटीने मोठं असतं. त्यामुळे आमचे जे महत्त्वाचे प्रोजेक्ट असतील.. रेल्वे, विमानतळ, मेट्रो वैगरे सारखे मोठे प्रकल्प..
या संदर्भात केंद्राच्या सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार गेला तर त्या भागाचा जास्त फायदा होतो. आज मी महाराष्ट्राचा एक आमदार म्हणून निधी आणायचं काम करतोय. परंतु तो निधी केंद्राच्या तुलनेने कमी असतो.
1967 पासून 2014 पर्यंत म्हणजे 33 वर्ष झाली.. आम्ही बारामतीत जनाई, शिरसाई केली उपसा सिंचन केलं.. पण पुणे वाढतंय. पिण्यासाठी पाणी द्यावं लागतंय. शेतीचं पाणी कमी होतंय. शेतकऱ्यांना समाधानी केलं की, आर्थिक सुबत्ता येते. म्हणून आम्ही काम कशाला करतो.. तर आम्हाला सत्ता मिळावी म्हणून काम करत नाही.
आपल्याला काम करायचं म्हटलं तर रिझल्ट दिले गेले पाहिजे. मला केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर आणायचा आहे. आज मी पंतप्रधानांना सांगितलं की, बारामती-फलटण हा रेल्वे प्रकल्प अनेक वर्ष अडकून पडला आहे. ते म्हणाले की, ठीक आहे. मी आचारसंहितेच्या आधी देशातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प जे आहेत त्याचं भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करतो. त्यात तुमचंही काम घेतो.. तेही त्यांनी घेतलं.
प्रश्न: ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी आहे का?
अजित पवार: अजिबात नाही.. कारण मला माझ्या भागाचा, लोकसभा मतदारसंघाचा.. राज्याचा विकास करायचाय. जसं पुण्याच्या विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन केलं मोदी साहेबांनी.. हे काम अनेक वर्ष अडकलं होतं. पण गिरीश बापट साहेबांनी केंद्राच्या मागे लागून ते काम करून घेतलं. कुठल्याही कामात राज्याला केंद्राची गरज लागते.
प्रश्न: याच भाजपने आपल्यावर आरोप केले सिंचन घोटाळ्याचे.. देवेंद्र फडणवीस, भाजपने.. चक्की पिसिंगची व्हिडिओ नेहमी दाखवली जाते.
अजित पवार: आरोप केले हे बरोबर आहे.. त्याची चौकशी झाली.. त्यामध्ये अनियमितता झाली.. ते प्रकरण कोर्टात आहे. एमएससी बँकेत 10 हजार कोटीचा घोटाळा झाला असे आरोप झाले. त्यामध्ये सहकार विभागाने, ACB ने चौकशी केली. सीआयडीने, ईओडब्ल्यूने चौकशी केली. न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली.
अशा अनेकांना चौकशी केली. त्याचा रिपोर्ट तयार आहे. त्यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. असं त्यात निष्पन्न झालेलं आहे अशी माझी माहिती आहे. पण आपल्या इथे न्यायव्यवस्था आहे.. त्याला विलंब लागतो.. त्यामुळे आरोप असलेल्या कार्यकर्त्यांची बदनामी होते. बदनामीची किंमत त्या-त्या व्यक्तीला मोजावी लागते.
जी आज 70 हजार कोटीचा घोटाळा, बँकेचा घोटाळा यामुळे बदनामीची किंमत आज मी मोजतोय. आज माझी प्रशासनावरची पकड आणि कामाची पद्धत ही उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मला काम करायला आवडतं. मोदी साहेब पण काम करणारी व्यक्ती आहे. ते सकाळपासून उशिरापर्यंत कामच करत असतात. त्यामुळे कुठे तरी गोष्टी जोडल्या आहेत.
प्रश्न: तुम्ही या निर्णय घेण्याआधी मोदींनी भोपाळमध्ये 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. कुठेतरी त्यांना पण हे लक्षात आलं का की आपण अन्याय केलाय?
अजित पवार: जोपर्यंत त्याची संपूर्ण चौकशी होऊन नेमकं सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत इतरांना कसं वाटेल की अन्याय झाला.. जर वस्तूस्थिती पुढे आली तरच ते लोकांना कळणार आहे.
मी जेव्हा सगळ्यांसोबत होतो तेव्हा सगळेजण माझं समर्थन करत होते. आमचे उद्धव ठाकरे साहेब पण मला बरोबर घेऊन त्यांनी सरकार चालवलं. जर मी इतका वाईट, घाणेरडा, भ्रष्टाचारी.. नालायक माणूस होतो तर त्यांनी अटी घालायला पाहिजे होत्या की, हा माणूस सरकारमध्ये असेल तर आम्ही सरकार बनवणार नाही. किंवा मी तसाच माणूस होतो तर आता मी ज्यांच्या बरोबर गेलो त्यांनी सांगायला पाहिजे होतं की, या माणसाची काही गरज नाही. हा माणूस नालायक आहे.. हा सरकारमध्ये घेण्याच्या लायकीचा नाही.
मी महाराष्ट्राला स्पष्ट सांगतो.. आजपर्यंत जेवढे पक्ष महाराष्ट्रात आहेत त्यांनी कधीकाळी मला जवळ केलंय ते माझ्या कामामुळेच जवळ केलंय.
प्रश्न: अजितदादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पुढे जाणार नाही हाच यातून मेसेज जातो?
अजित पवार: नाही ओ.. मी एक साधा कार्यकर्ता आहे.. माझा राजकारणाशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. मी त्यात पुढे जात गेलो, अडकत गेलो.. गुंतत गेलो.. जबाबदारी वाढत गेली. मी असा विचार करतो की, माझ्यावर एवढी जबाबदारी आहे तर बाजूला जाऊ शकत नाही. तो पळपुटेपणा ठरेल. मला कुठलंही काम करताना पळपुटेपणा केलेला आवडत नाही.
प्रश्न: एक महत्त्वाकांक्षा आहे की नाही.. एक दिवस मुख्यमंत्री व्हायचंय..
अजित पवार: चार नाही.. पाच वेळा मी उपमुख्यमंत्री झालोय. माझा रेकॉर्ड कोणी तोडू शकणार नाही महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाचा..
हे बघा प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्याला महत्त्वाकांक्षा असते.. जो माणूस आहे.. ज्याची काम करायची इच्छा आहे त्याची महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे.. नाहीतर असे कितीतरी जन्मला येतात आणि जातात. हे संपूर्ण जगात चाललं आहे. पण आपण असं काही तरी काम करून दाखवलं तर लोकांनी पण स्मरणात ठेवलं तर एक वेगळं समाधान मिळतं.
माझी आज नाही.. फार दिवसांपासूनची इच्छा आहे. परंतु ते थोडक्यात हुकतंय..
प्रश्न: आता संधी मिळाली 2024 मध्ये तर ती सोडायची नाहीए?
अजित पवार: काम करत राहायचंय.. लोकशाहीमध्ये किती काही इच्छा.. कोणी पंतप्रधानाची इच्छा प्रदर्शित केली.. तरी जोपर्यंत 543 मध्ये बहुमत मिळत नाही तोपर्यंत कोणीही पंतप्रधान होत नाही. आता देवेगौडा पंतप्रधान होतील असं वाटलं होतं का? पण मिळालं पंतप्रधान पद.. अशा अनेकांची नावं मी घेऊ शकतो.
उद्या आम्ही सहकाऱ्यांना घेऊन 145 चा आकडा गाठू शकलो. जे सहकारी असतील त्यांनी मान्यता दिली तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यांनी मान्यता दिली नाही तर मी कितीही प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही.
प्रश्न: फडणवीस आणि तुमचं अंडरस्टँडिंग चागलं आहे.. तीन पक्षाच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा काम करत आहात. नेमका काय फरक आहे.
अजित पवार: अनेक राज्यात नेत्याने स्वत:च्या जोरावर एकट्याचं सरकार आणलं. ममता बॅनर्जी, नितीशकुमार.. मायावती, अखिलेश, जयललिता, स्टॅलिन.. केजरीवाल घ्या.. किती तरी दिग्गजांची नावं घेता येतील.
महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे वेगळं आहे. 1985 पासून कुणालाच पूर्ण बहुमत मिळालं नाही. त्यामुळे पक्षांना एकत्र घेऊनच सरकार चालवावं लागतं. कारण इथली परिस्थिती.. इथला मतदार हा वेगळा विचार करतो. हे कोणी नाकारू शकत नाही. अनेक दिग्गज नेते होऊन गेले पण त्यांना एकट्याच्या ताकदीवर सरकार बनवता आलं नाही.
पक्षाच्या व्यासपीठावर खंत बोलून दाखवली होती. 75 आकडा गाठू शकलो नाही. त्यामुळे तडजोडी कराव्या लागतात. त्याला उपायच नाही. नाहीतर मग राष्ट्रपती राजवट..
कुठेतरी तुम्हाला राज्यात लोकाभिमुख सरकार करायचं असेल तर सहकारी मित्रांना एकत्र घेऊनच सरकार बनवावं लागतं.
प्रश्न: महाराष्ट्रातील विरोधी पक्ष एक कणखर विरोधी पक्ष म्हणून काम करायला कमी पडतात आणि म्हणून ते एकट्याच्या जीवावर सरकार आणू शकत नाही का?
अजित पवार: यामध्ये अजिबात तथ्थ नाही.. तुम्ही मागचा इतिहास पाहिला तर अनेक आंदोलन झाली.. दिंड्या काढल्या. मुंडे साहेबांनी आक्रमकतेने महाराष्ट्र पिंजून काढला होता. बाळासाहेबांनी महाराष्ट्र आक्रमकपणे पिंजून काढला होता. पवार साहेबांनी पण महाराष्ट्र पिंजून काढला होता. आम्ही पण आमच्या पद्धतीने पिंजून काढला.
पण हे सत्यच आहे की, जसं मोदी साहेबांचा करिष्मा पूर्ण देशात चालला.. मोदी साहेबांनी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना एक विश्वास दिला. म्हणून एकेकाळी 2 खासदार असणारा पक्ष आज दोन-दोन वेळेला पूर्ण बहुमताने निवडून येतो.. हे काही तरी जनतेचा विश्वास संपादन केला म्हणूनच ना..
प्रश्न: निवडणुकीनंतर तुम्ही एकत्र येणार का? विधानसभेच्या निवडणुकीआधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात का?
अजित पवार: जर साहेबांनी.. मी भरपूर वर्ष काम केलेलं आहे. आता तुम्ही सगळेजण मिळून पुढं एकत्र काम करा असं सांगितलं. आज देखील त्यांच्याबरोबर असणाऱ्या अनेक आमदारांनी सह्याच करून दिल्या होत्या ना.. की, तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत जावं म्हणून..
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून सतत राष्ट्रवादी.. एखाद्या टर्मचा अपवाद वगळता सरकारमध्ये, सत्तेत राहिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत काम करणाऱ्यांना आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील त्यांना सत्ता असल्याशिवाय विकासकामं करता येत नाही. हे कोणी नाकारू शकत नाही. तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्हाला सत्ताधारी पक्षासोबत जावंच लागतं.
माझं काय म्हणणं आहे की, प्रत्येकाचा काही ना काही काळ असतो ना.. प्रत्येकाने काही काळापर्यंत भरपूर काम करावं.. भलं करावं. परंतु नंतर पुढे काही वर्षाने नव्या लोकांना पण संधी द्यावी.
प्रश्न: याचा मेसेज काय गेला की, अजित पवार म्हणतात की, शरद पवार तुम्ही रिटायर होऊन जा..
अजित पवार: नाही.. नाही.. तसं नाही.. मला कोणाला रिटायर व्हा असं म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही किती वर्ष काम करावं हा तुमचा अधिकार आहे. ही लोकशाही आहे. संविधानाने ते तुम्हाला दिलेले आहे.. राजदीपजी तुमचे वडील विख्यात क्रिकेटपटू होते. क्रिकेटमध्ये देखील काही जणं त्यांचा चांगला परफॉर्मन्स असतानाच ते रिटायर होता. काही जणं उशिरा रिटायर होतात. आज धोनी आयपीएलला पण चालतात. सचिनीज यांचंही आहे.. असं प्रत्येक क्षेत्रात असतं.. मी धोनी, सचिनचं उदाहरण दिलं. निवृत्त व्हावं की ज्याच्या त्याच्या हातात आहे.
राजकारण असं आहे की, पिकवर असताना तो व्यक्ती टॉपवर असतो. तेव्हा तो का रिटायर होईल? आज ज्यांनी त्यांनी आपआपला विचार करावा. आमचा कोणालाही आग्रह नाही..
प्रश्न: अजित पवारांचं क्रिकेटचं नॉलेज हे भरपूर आहे.. लोकांना वाटतं की, अजित पवारांना राजकारणाच्या बाहेर काही दिसत नाही.
अजित पवार: काय झालंय.. आमच्या कानफाट्या नाव पडलंय.. हे काय चिडका आहे.. हा कडक बोलतो.. हा एक घाव दोन तुकडे करतो. ही माझी इमेज सगळ्यांनी करून ठेवली आहे. त्यामध्ये 70 हजार आणि महाराष्ट्र बँकेचा घोटाळा.. एमएससी बँक ही दरवर्षी 600 ते 700 कोटी नफ्यात आहेत. कुठल्याही बँकेचा घोटाळा झाला तर ती बँक रसातळाला जाते..
आज कागदपत्रं झाकली जात नाही.. चेकशिवाय तर बँकेचा व्यवहार होत नाही. कॅशमध्ये तर व्यवहार होत नाही. 50 ठिकाणी चौकशी करा ना..
मी ज्यांच्या बरोबर रात्रीचा दिवस केला.. दैवत मानून मनापासून काम केलं त्यांच्यातील पण काही बगलबच्चे याच्याबद्दल बोलायला लागले आहेत. आता आम्हाला पण काहीनी सांगितलं की, सुप्रिया उमेदवार आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. सुनेत्रावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. तुम्ही मंत्री झाल्या तरच निर्णय प्रक्रियेची फाइल यायला सुरुवात होते. त्यातून एखादं काम करत असताना काही आरोप केले जातात.
मग त्यांनी भ्रष्टाचार केला नाही.. पण आरोप झाला नाही.. लवासाचा आरोप झाला ना.. झालाय की नाही? कोर्टात प्रकरण चालू आहे की नाही? त्याला आम्ही जबाबदार आहोत का? त्यानंतर दुसरं हे सगळं घडत असताना.. तेव्हा आम्ही राजकारणात एकदम ज्युनिअर होतो. पण 1978 ते 80 त्या काळात भूखंडाचे श्रीखंड हा आरोप झाला की नाही..
त्या आरोपात तथ्य नाही.. पण झाला की नाही.. त्यानंतर एनरॉनचा आरोप.. तो आरोप झाला की नाही.. दाऊदशी संबंध.. हे आरोप झाले.. संबंध नाहीएत. अजिबात नाहीए.. पण आरोप झाले ना.. केव्हा आरोप होतात.. तुम्ही त्या पदावर काम करत असाल तर आरोप होतात. तुम्ही निर्णय घेताना आरोप होतात. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.
प्रश्न: तुम्हाला पक्षाने हवं तर डिफेंड केलं नाही का?
अजित पवार: त्यावेळेश श्वेतपत्रिका काढली गेली. त्यात खडसे साहेबांनी नावं सुचवली. माधवराव चितळे.. पाच जणांची अतिशय चांगल्या नावाजलेल्या लोकांची कमिटी केली होती. ती श्वेतपत्रिका आजही आहे. पृथ्वीराज चव्हाण हे तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांनी ती श्वेतपत्रिका स्वीकारली असती तर त्यातून दूध का दूध आणि पानी का पानी झालं असतं..
परंतु त्या काळात पृथ्वीराज यांच्यासोबत सरकार करत असताना त्यांनी.. आम्हाला कधी जवळचं मानलंच नाही.. मी स्पष्टपणे सांगतो.
पृथ्वीराज यांनी शिवसेना आणि भाजप हे जवळचे धरले. राष्ट्रवादी शत्रू नंबर 1 धरला.. आम्ही त्यांच्यासोबतच सरकार केलं होतं.
प्रश्न: फडणवीसांनी तुमच्यावर देखील आरोप केले होते..
अजित पवार: आरोप केले ना.. अशीच मुलाखत घेत असताना.. अजित पवारांसोबत जाणार का.. नाही, नाही.. नाही.. असं म्हणालेले.. आम्ही तेच सांगतो.. राजकारणात कोणी-कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. कधी काय घडेल.. ती त्या-त्या वेळेसची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केलं जातं.
प्रश्न: पक्षाचे अध्यक्षाचे म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. जागांच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रवादीला कुठे बघतात.. काही नेत्यांना वाटतं की, प्रादेशिक पक्ष हे भाजपसोबत गेले की ते त्यांना संपवतं..
अजित पवार: ममता बॅनर्जी पण भाजपच्या काळात.. काळ कुणाचा का असेना.. याला काय अर्थ आहे. नितीशकुमार पण गेले.. आले.. मायवती पण गेल्या.
प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने काम करत असतं. टीका करणाऱ्यांना त्यांचा अधिकार आहे. तुम्ही पक्षबांधणी कशी करता, सगळ्यांना विश्वासात घेऊन काम कसं करता.. लोकांचा विश्वास कसा संपादन करता हे महत्त्वाचं आहे.
प्रश्न: तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कशी झाली पाहिजे हे तुम्ही बघता..
अजित पवार: मी जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजूबत असावा.. एवढं मी पाहतो.
प्रश्न: शरद पवार हा कार्यक्रम पाहत असतील.. ते विचार करत असतील की, मी अजित पवारांना एवढं काही दिलं.. त्यांना उपमुख्यमंत्री केलं आणि आज ते मी स्थापन केलेला पक्ष घेऊन गेले.. ते असंही काल म्हणाले की, माझ्या नावावर मतं मागितली.. यावर काय म्हणणं आहे तुमचं.. जर ते म्हणाले की हा धोका आहे तर..
अजित पवार: याबाबत त्यांनी काय शब्द वापरावा.. ते वरिष्ठ आहेत. त्याबद्दल मला काहीही कमेंट करायच्या नाहीत. पण एकंदरीत कोणीही काम करत असताना त्यांच्या सहकाऱ्यांचा पण काही ना काही खारीचा वाटा असतो.
मी खोटं नाही सांगत.. ज्या दिवसापासून मी त्या पक्षात काम करायला लागलो त्या दिवसापासून मी कुठेही कमी पडायचं नाही हे ठरवलं. मी काम करत गेलो.. माणसं जोडत गेलो..
विधानसभेला अनेक नवखे आमदार मी पारखले. मी त्यांना तिकीटं दिली. अशा पद्धतीने या गोष्टी झाल्या. माझ्या परिने मी काम करतो. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. कारण ते आम्हाला वडिलांसमान आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT