Lok Sabha elections 2024: शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचं कापलं तिकीट; शिंदेंनी गमावली जागा...
Shiv Sena Shinde Group: लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला बरीच तडजोड करावी लागत आहे. आधी रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट शिंदेंना कापावं लागंल. तर त्या पाठोपाठ अमरावतीची जागाही भाजपसाठी सोडावी लागली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिंदे गटाने अमरावतीची जागा गमावली
भाजपने जाहीर केला अमरावतीचा उमेदवार
भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर
Shiv Sena Shinde Group compromise in many Seats: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha elections 2024) महायुतीत शिवसेनेच्या (शिंदे गट) जागा कमी होत असल्याचं दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप शिंदे गटाला केवळ 12 ते 15 जागा देण्यासच तयार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. असं असताना 2019 साली ज्या अमरावतीमध्ये शिवसेनेने निवडणूक लढवली होती ती जागा भाजपने स्वत:कडे घेतली आहे. एवढंच नव्हे तर अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनाच भाजपने तिकीट दिलं आहे. पण यामुळे शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचं तिकीट कापलं असून त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. (lok sabha elections 2024 shiv sena veteran leader anandrao adsul denied candidature bjp took amravati seat held by shinde group)
अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष खासदार नवनीत राणा या होत्या. पण तरीही शिवसेनेकडून सातत्याने या जागेवर दावा सांगितला जात होता. पण नवनीत राणा या भाजपमध्ये येण्यास आधीपासूनच उत्सुक होत्या. त्यामुळे त्यांनाच पक्षात घेत भाजपने अमरावतीची जागा शिवसेनेकडून अक्षरश: हिसकावून घेतली.
भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांनाच पराभूत करून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आनंदराव अडसूळ हे देखील ठाकरेंना सोडून शिंदेंच्या गटात गेले होते. तेव्हापासूनच ते अमरावतीच्या जागेसाठी आग्रही होते. पण आता भाजपने आनंदराव अडसूळ यांचं तिकीट कापून विद्यमान खासदार नवनीत राणांवरच विश्वास दाखवला आहे.
हे ही वाचा>> मविआमध्ये शिवसेनाच (UBT) मोठा भाऊ, पण महायुतीत शिंदे...
शिवसेनेने 2019 साली युतीत ज्या जागा लढवल्या होत्या त्याच जागा त्यांना मिळाव्यात असा आग्रह भाजपकडे धरण्यात आला होता. मात्र, भाजपने त्यांचा आग्रह पुरवला नाही. कमळ चिन्हावर जास्तीत उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच अमरावतीसारखा मतदारसंघ देखील भाजपने स्वत:कडे खेचून घेतला.










