सिध्दू मूसेवाला हत्या प्रकरण: अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत झाली वाढ,नेमकं काय आहे कारण?

सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सिध्दू मूसेवाला हत्या प्रकरण: अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत झाली वाढ,नेमकं काय आहे कारण?

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची वयाच्या २८ व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाबच्या मनसा जिल्ह्यात त्यांच्यावर ३० राउंड फायर करण्यात आल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येची जबाबदारी कॅनडामधील गँगस्टर गोल्डी बरारने घेतली आहे. मात्र असा दावा केला जात आहे की या हत्येचं प्लानिंग दिल्लीच्या तिहार जेलमध्ये करण्यात आलं होतं. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी तिहार जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार हे एकमेकांचे साथीदार आहेत. या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर राजस्थानमधील गँगकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्याच्या प्लानिंगपासून सुरक्षित राहावा यासाठी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, “आम्ही सलमान खानची सगळी सुरक्षा वाढवली आहे. पोलीस त्याच्या अपार्टमेंटच्या आसपास तैनात असणार आहेत. जेणेकरून त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये.”

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा बऱ्याच गुन्ह्यात सहभाग आहे. त्याच्या गँगचं काम पंजाब व्यतिरिक्त, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्येही चालतं. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती. रिपोर्ट्सनुसार २०१८ मध्ये काळवीट शिकार प्रकरणाच्या वेळी लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी दिली होती. त्यानंतर बिश्नोईच्या एका साथीदाराला अटकही झाली होती. बिश्नोई समाजानेच सलमानच्या विरोधात कळवीट शिकार प्रकरणात खटला दाखल केला होता. काळवीट हे या समाजात पवित्र मानलं जातं.

Salman Khan's security has been increased after the assassination of Sidhu Moose Wala
Salman Khan's security has been increased after the assassination of Sidhu Moose Wala

जेव्हा लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळीही सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. दरम्यान सध्या लॉरेन्स बिश्नोई दिल्ली तुरुंगात बंद असला तरीही सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. अशातच बिश्नोईनं पंजाब पोलीस माझा एनकाउंटर करू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे. मात्र पंजाब पोलीसांनी त्याला ताब्यात घेण्याची कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in