Shiv Sena: ठाकरेंशी वैर घेऊन भाजपसोबत गेलेले शिंदे तहात फसले, 13 जागांवर सोडणार पाणी?
Shiv Sena Lok sabha Election 2024: एकनाथ शिंदे यांनी दोनच वर्षांपूर्वी शिवसेनेत एक मोठं बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केली होती. मात्र, आता लोकसभा निवडणुकीत शिंदेंना मोठी तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकनाथ शिंदेंना सोडाव्या लागणार 13 जागा?
भाजपची मागणी शिवसेना करणार पूर्ण?
एकनाथ शिंदे भाजपसोबतच्या तहात फसले?
Eknath Shinde Amit Shah Lok Sabha Election 2024: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 साली ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये बंड केलं होतं. त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं होतं. कारण अत्यंत अनपेक्षितपणे शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत जाणं पसंत केलेलं. ज्या मोबदल्यात त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदही मिळालं. मात्र, या सगळ्याला आता जवळजवळ दोन वर्ष होत आहेत. त्यानंतर आता भाजपने आपले पत्ते उघड करण्यास सुरुवात केली आहे. ज्याचा फटका थेट शिंदे आणि शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. (eknath shinde who went with bjp after enmity with thackeray was deceived in treaty shivsena will have to give 13 constituencies to bjp)
ठाकरेंशी वैर घेऊन भाजपसोबत गेलेले शिंदे हे आता तहात मात्र, पुरते फसले असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजप केवळ 10 जागा देणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. ज्याचा सर्वाधिक फटका हा त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांना बसू शकतो. त्यामुळे शिंदे आणि शिवसेनेच्या खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बरीच अडचण होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Mahayuti : भाजप 32 जागा, पवारांना 3, तर शिंदेंना फक्त...; शाहांनी काय सांगितलं?
2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेनेसोबत युती केली होती. त्यावेळी शिवसेनेचे सर्वेसर्वा हे उद्धव ठाकरे होते. त्यावेळी भाजपने शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा जास्त लढवल्या होत्या. म्हणजे भाजपने 25 आणि शिवसेनेने 23 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.
मात्र, आता महाराष्ट्रात भाजपला आपले अधिकाधिक खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे त्यांना राज्यात तब्बल 32 जागा हव्या आहेत. तर भाजप शिंदेंना फक्त 10 जागा देण्यास तयार आहे. तर 6 जागा या अजित पवार गटाला देणार असल्याचं समजतं आहे.










