Baramati Vidhan Sabha : भाषणाचे अर्थ, बुथवरचा राडा, मतदानाचा टक्का वाढला..'या' गणितामुळे अजितदादांना फायदा?
बारामतीत विजय कुणाचा होणार यावरुन वेगवेगळे चंग बांधले जात आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवार यांनी मतांची जुळवणी कशी केली?

युगेंद्र पवार यांच्यासाठी पवारांनी जोर लावला का?

दोन्ही नेत्यांची भाषणं काय सांगतात?
Baramati Vidhan Sabha : राज्यभरात काल विधानसभा निवडणुका पार पडल्या. मतदान संपताच काल वेगवेगळ्या एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी आपले अंदाजही वर्तवले आहेत. वेगवेगळे एक्झिट पोल पाहिल्यास राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातली परिस्थिती पाहता, राज्यात अपक्षांचा बोलबोला राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र ही सगळी आकडेमोड वगळता राज्यात आणखी एका गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे बारामती विधानसभा मतदार संघ. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत म्हणजेच लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्वत: अजित पवार यांनाही युगेंद्र पवार यांच्याविरुद्ध लढावं लागलं आहे. त्यामुळे बारामतीत विजय कुणाचा होणार यावरुन वेगवेगळे चंग बांधले जात आहेत.
अजित पवार-शरद पवारांच्या भाषणाचे मुद्दे
बारामतीमध्ये 18 नोव्हेंबरचा दिवस महत्वाचा होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या सांगता सभेत शरद पवार आणि अजित पवार यांची भाषणं महत्वाची होती. यातूनच पुढची लढत कशी असणार हे स्पष्ट होणार होतं. शरद पवार यांनी राज्यभर प्रचाराच्या वादळी सभा घेतल्या. यंदाच्या निवडणूक प्रचारात त्यांचा 'पाडा, पाडा, पाडा' हा डायलॉग आणि वळसे पाटलांना गद्दार म्हटल्यानं चर्चा झाली. मात्र शरद पवार यांनी ज्याप्रमाणे इतर ठिकाणी उमेदवारांविरोधाक आक्रमक पवित्रा घेत भाषणं केली, त्यामुळे बारामतीत शेवटच्या दिवशी पवार काय बोलतील यावर सर्वांचं लक्ष होतं. अजित पवार यांना ते पाडा पाडा पाडा म्हणणार का याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र शरद पवार तसं म्हणाले नाही. पवारांनी शांतपणे भाषण करत युगेंद्र पवार यांचं कौतुक करत त्यांच्याकडे जबाबदारी द्यायची आहे असं सांगितलं. अजित पवार यांना पाडा असा थेट उल्लेख केला नाही. उलट या भाषणात त्यांनी 'अजित पवारांनी कामं केली, त्याबद्दल तक्रार नाही' असा उल्लेख केला. तर अजित पवार यांचाही सूर एकच होता. ते म्हणत होते की, लोकसभेला चुकलो, लोकसभेला तुम्ही साहेबांना मदत केली, विधानसभेला तुम्ही मला साथ द्या. त्यामुळे बारामतीकरांपुढे मोठा पेच होता.