Maharashtra Politics : 'माझी लाडकी बहीण' महायुतीला तारणार? समजून घ्या राजकीय अर्थ
Maharashtra Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा केल्या जाणार अशी चर्चा होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांसाठीच्या गोष्टी...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा फायदा होईल का?

महायुतीची महिला व्होटबँकेवर नजर

विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा
Mahayuti News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागाच जिंकता आल्या. 2014 आणि 2019 महायुतीने 41 जागा जिंकल्या होत्या. आता तीन पक्ष, केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. जबर फटका बसल्यानंतर महायुतीने आता महत्त्वाच्या व्होटबँकेकडे लक्ष वळवलं आहे. त्याची झलक अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून दिसत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रचंड चर्चा होत आहे. त्यामुळे तिचा राजकीय अर्थ समजून घेणं महत्त्वाचे आहे.
अजित पवारांनी शुक्रवारी (28 जून) राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडला. यात महत्त्वाची आणि चर्चेची बाब ठरली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय?
अजित पवारांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना सरकारकडून दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. यासाठी सरकारने 46 हजार कोटी रुपयांचा निधीही प्रस्तावित केला आहे. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना घेता येईल? त्याचे निकष काय असतील? याबद्दल आता सरकारकडून माहिती प्रसिद्ध केली जाईल. पण, या योजनेमुळे आगामी निवडणुकीत राजकीय फायदा होईल का, हा विषय महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्रात महिला मतदार निवडणूक निकालात निर्णायक
अलिकडेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालामुळे महायुती खडबडून जागी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांतील मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न आता सरकारकडून अंतिम टप्प्यात केले जाताना दिसत आहे. यात महिलाही आहेत. आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्याचा फायदा महायुतीला निवडणुकीत होईल का याबद्दल आताच कुणीही मांडताना दिसत नाही.