पुणे: ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग, संभाजी ब्रिगेडने केली कारवाईची मागणी

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातल्या लाल महाल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या लाल महालात शाहिस्तेखान थांबला होता तेव्हा त्याची बोटं छत्रपती शिवरायांनी छाटली होती. सध्या पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत हा लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. अशातच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने तमाशातल्या गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

सिने दिग्दर्शक सुनील बापट आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील यांनी हे कृत्य केलं आहे. व्हीडिओत स्पष्ट दिसतं आहे की नृत्यांगना वैष्णवी पाटील ठुमके लगावत लावणीच्या तालावर लाल महालात नृत्य करते आहे. पुणे महापालिकेचे अधिकारी सुनील मोहित यांनी आज तकला दिलेल्या प्रतिक्रियेत हे स्पष्ट केलं आहे की लाल महालात जो प्रकार घडला त्यात सुरक्षा रक्षकाची चूक आहे. लाल महालात कधीही कोणत्याही प्रकारच्या सीरियल किंवा कोणत्याही शुटिंगला संमती देण्यात येत नाही. मात्र आता त्या सुरक्षा रक्षकाची बदली करण्यात आली आहे असंही मोहिते यांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा प्रकार समोर आल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक होत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांना संभाजी ब्रिगेडने पत्र लिहिलं आहे आणि या प्रकरणी जे कुणी जबाबदार असतील त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनाही संभाजी ब्रिगेडने पत्र लिहिलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे संभाजी ब्रिगेडने पत्रात?

ADVERTISEMENT

राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन माणसाच्या हृदयात असलेले मानाचे आणि आदरांचे स्थान या बद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. अशा थोर पुरुषाचे बालपण जिजाऊ साहेब यांच्या सानिध्यात पुण्यातील ज्या पवित्र वास्तूत व्यतीत झाले, ज्या ठिकाणी महाराजांनी जिजाऊसाहेबा कडून नीतिमतेचे धडे घेतले आणि त्यांच्या अद्वितीय आणि और व्यक्तिमत्वाची जडण घडण झाली आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या “लालमहाल” या पवित्र वास्तूची तेथे लावणी नृत्याचे प्रकार करून विटंबना करण्याचा प्रकार समोर आला आहे.

लालमहाल ही वास्तू महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखाली आहे. सदर वास्तूचे पावित्र्य राखून तिथे जतन करण्याचे शासनाचे आदेश असताना अनधिकृत पणे तेथे केदार अवसरे नामक व्यक्तीने वैष्णवी पाटील या नृत्यांगनेच्या लावणी नृत्याचा प्रकार घडवून आणला आहे. हा प्रकार येथे एव्हड्यानेच थांबला नसून या बाबतची पोस्ट फेसबुक या सामाजिक माध्यमावर दिनांक 16/05/2022 रोजी कुलदीप बापट नामक व्यक्तीने जो ( या नृत्याचे विडिओ चित्रण करणारा आहे) प्रकाशित केली आहे. सदरच्या पोस्ट मध्ये नर्तिका वैष्णवी पाटील ही शृंगारिक नृत्याद्वारे अंग विक्षेप करून लावणी म्हणत असल्याचे दिसून येत आहे. मुळात आमचा महाराष्ट्राची लोककला म्हणून प्रसिद्ध असलेल्या लावणी नृत्यकलेला विरोध मुळीच नाही पण ज्या पवित्र स्थळी ती सादर करण्यात आली त्याला आमचा विरोध आहे.

लालमहाल या पवित्र वास्तूत ज्या ठिकाणी महाराजांनी आपले बालपण व्यतीत केले. जिजाऊ मातेकडून नीतिमतेचे धडे घेतले. आपल्या शौर्याने आणि चतुराईने शाहिस्तेखानाची बोटे तोडून दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केला अशा ऐतिहासिक ठिकाणी वर नमूद केलेल्या व्यक्तींनी केलेल्या अक्षम्य अपराधामुळे महाराजांची बदनामी झाली असून समस्त शिवप्रेमी आणि जनमाणसाच्या भावना दुखावल्या असून त्यान्च्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सदर प्रकरणी सखोल चौकशी होऊन आरोपीना शासन होणे गरजेचे आहे.

लाल महाल या वास्तूत अनधिकृत पणे लावणी नृत्याचा कार्यक्रम करून जन माणसास ठेच लागेल असे कृत्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही सदरची तक्रार आपणाकडे सादर करीत आहोत. सदर घटनेचा व्हिडीओ आणि इतर माहिती या सोबत आपणास सादर करण्यात येत आहे. तरी आपणास विनंती करण्यात येते की वर नमूद केलेल्या व्यक्ती विरुद्ध FIR दाखल करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. याबाबत कठोर कारवाई न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेऊ यांची संपूर्ण नुकसानीची जबाबदारी ही सरकारची राहिल असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT