‘मोदी-शाहांच्या इशाऱ्यावर शिंदेंनी कोंबडी कापून खाण्याचे ठरवलंय’, BMC मोर्चा आधी ‘सामना’तून हल्ला
महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात असतानाच आता शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 1 जुलै रोजी आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बीएमसीवर मोर्चा काढला जाणार आहे.
ADVERTISEMENT

Mumbai Politics Latest News : मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीने कंबर कसल्याचं दिसत आहे. महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात असतानाच आता शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 1 जुलै रोजी आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बीएमसीवर मोर्चा काढला जाणार आहे. याच मोर्चाच्या आधी शिवसेनेने (युबीटी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला आहे. (Uddhav Thackeray Shiv Sena attacks on Eknath Shinde and devendra Fadnavis)
शिवसेनेने (युबीटी) सामना अग्रलेखातून मुंबई महापालिकेवर प्रशासक आल्यापासून घेतल्या गेलेल्या निर्णयांवर बोट ठेवलं आहे. शिवसेनेने म्हटलंय की, “पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची दैना उडाली आहे. भ्रष्टाचाराने मुंबई तुंबल्याचा हा परिणाम. महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे सरकार नाही, महापौर नाहीत, विषय समित्या नाहीत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने मुंबईचा जो कारभार सध्या चालला आहे त्यास फक्त लुटमार असेच म्हणता येईल.”
शिंदेंसाठी मुंबई म्हणजे एटीएम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करताना सामना अग्रलेखात असंही म्हटलंय की, “मुंबई पालिकेत जी लुटमार सुरू आहे ती फडणवीस-मिंधे यांच्या आशीर्वादाने. मुंबई म्हणजे मुंबादेवी ही महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची माऊली, पण मिंध्यांसाठी मुंबई म्हणजे ‘एटीएम’ किंवा सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. भाजप अंडी खात आहे व मुख्यमंत्री मिंधे यांनी सरळ कोंबडी कापून खाण्याचे ठरवले आहे, ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर.”
हेही वाचा >> ‘पवारांच्या तोंडून सत्य.. गुगलीमुळे माझ्याऐवजी त्यांचे पुतणेच..’, फडणवीसांचा पलटवार
शिवसेनेसह (युबीटी) विरोधकांकडून सातत्याने शिंदेंच्या शिवसेनेला खोके म्हणून डिवचलं जात आहे. अग्रलेखात याचा उल्लेख करत पुन्हा वर्मावर बोट ठेवलं आहे. “महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात किमान सहा हजार कोटींचा जम्बो घोटाळा झाला आहे. ज्या पाच कंपन्यांना या कामाचे टेंडर मिळाले त्यांच्यामागचे खरे सूत्रधार हे ‘खोके’ सरकारचे मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय आहेत. पण तुमची ती ‘ईडी’ वगैरे यंत्रणा त्याबाबत डोळे मिटून बसली आहे”, असं शिवसेनेने (युबीटी) म्हटलं आहे.