मोदी सरकारने २२ यूट्युब चॅनेल्सवर का घातली बंदी?; ४ पाकिस्तानी चॅनेल्सचाही समावेश
२२ यूट्युब चॅनेल्सवर बंदी / 22 YouTube channels blocked by Ministry of Information & Broadcasting

मोदी सरकारने २२ यूट्युब चॅनेल्सवर का घातली बंदी?; ४ पाकिस्तानी चॅनेल्सचाही समावेश

22 YouTube Channels ban in india : एक वेबसाईट, तीन ट्विटर अकाऊंटस्, एक फेसबुक पेजवर करण्यात आली कारवाई

लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्युबरील तब्बल २२ न्यूज चॅनेल्सवर मोदी सरकारने आज मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयटी कायद्यातील आपतकालीन अधिकारांचा वापर करत २२ यूट्युब चॅनेल्सवर भारतात बंदी घातली आहे. या चॅनेल्सबरोबर एक वेबसाईट, तीन ट्विटर हॅण्डल्स आणि एक फेसबुक अकाऊट बंद करण्यात आलं आहे.

केंद्राने बंदी घातलेल्या या यूट्यब चॅनेल्सची प्रेक्षक संख्या २६० कोटी इतकी होती. या चॅनेल्सवरून संवेदनशील आणि भारताच्या सुरक्षा, विदेशी धोरणाशी संबंधित प्रकरणांशी संबंधित माहिती प्रसारित केली जात होती. बंदी घालण्यात आलेल्या चॅनेल्ससह वेबसाईट, सोशल मीडिया हॅण्डलवरून फेक न्यूज आणि चुकीची माहिती पसरवली जात होती, असं केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे.

आयटी नियम २०२१ च्या नुसार यूट्यूब चॅनेल्सवर अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये आयटी नियमांचं परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर आता १८ भारतीय आणि ४ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार या चॅनेल्सचा वापर विविध मुद्द्यांबद्दल फेक न्यूज पसरवण्यासाठी केला जात होता. विशेषतः भारतीय लष्कर, जम्मू कश्मीर यासारख्या मुद्द्यावर फेक पोस्ट चॅनेल्सवरून पसरवल्या जात होत्या. त्याचबरोबर विविध सोशल मीडिया अकाऊंट्सवरूनही भारताविरोधी माहिती पसरवणारे अकाऊंट्स बंद करण्यात आले आहेत.

यूट्यूब चॅनेल्सकडून युक्रेनबद्दलही चुकीची माहिती दिली गेल्याचंही चौकशीत आढळून आलं. दुसऱ्या देशांसोबतचे भारताच्या संबंधावर परिणाम करण्याच्या हेतूने या चॅनेल्सवरून ही माहिती प्रसारित केली जात होती, असं सरकारने म्हटलं आहे.

या यूट्यूब चॅनेल्सकडून वृत्तवाहिन्यांच्या लोगोंचा वापर केला गेला. त्याचबरोबर यूट्यूबवरील व्हिडीओच्या पोस्टर्सवर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या अँकर्सचे फोटोंचाही वापर केला जात होता. ज्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल केली जात होती.

डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत माहिती व प्रसारण मंत्रालयाने ७८ यूट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. अनेक सोशल मीडिया हॅण्डलसही या नियमानुसार ब्लॉक करण्यात आले आहेत. प्रामाणिक, विश्वासासार्ह आणि सुरक्षित ऑनलाईन पत्रकारिता वातावरण तयार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे.

कोणत्या यूट्युब चॅनेल्सवर घालण्यात आली बंदी? एआरपी न्यूज (ARP News), एओपी न्यूज (AOP News), एलडीसी न्यूज (LDC News), सरकारी बाबू (Sarkari babu), एसएस झोन हिंदी (SS Zone Hindi), स्मार्ट न्यूज (Smart News), न्यूज २३ हिंदी (News 23 Hindi), ऑनलाईन खबर (Online Khabar), डीपी न्यूज (DP News), पीकेबी न्यूज (PKB News), किसान तक (Kisan Tak), बोरना न्यूज (Borana News), सरकारी न्यूज अपडेट (Sarkari News Update), भारत मौसम (Bharat mausam), आरजे झोन ६ (RJ Zone 6), एक्झाम रिपोर्ट (Exam Report), दिगी गुरूकुल (Digi Gurukul), दिन भर की खबरें (Din bhar ki Khabare)

बंदी घालण्यात आलेले पाकिस्तानी चॅनेल्स

दुनिया मेरी आगे (Duniya mery Aagy), गुलाम नबी मदनी (Gulam nabi madni), हकिकत टीव्ही (Haqeeqat TV), हकिकत टीव्ही २.० (Haqeeqat TV 2.0).

बंदी घालण्यात आलेली वेबसाईट

दुनिया मेरी आगे (Duniya mery Aagy)

ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट्स

दुनिया मेरी आगे (Duniya mery Aagy), गुलाम नबी मदनी (Gulam nabi madni), हकिकत टीव्ही (Haqeeqat TV). दुनिया मेरी आगे (Duniya mery Aagy/facebook)

Related Stories

No stories found.