देवेंद्र फडणवीस गोव्यात असतानाच केजरीवालांची खेळी; गोवावासियांवर घोषणांचा पाऊस

Goa assembly election 2022 : 'आप'चं सरकार आल्यास तरुणांपासून ते पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांना देणार निर्वाह भत्ता
देवेंद्र फडणवीस गोव्यात असतानाच केजरीवालांची खेळी; गोवावासियांवर घोषणांचा पाऊस
देवेंद्र फडणवीस आणि अरविंद केजरीवालTwitter

राजकीय पक्षांना गोवा विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपने गोवा विधानसभेची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. सध्या फडणवीस गोव्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यातच आम आदमी पक्षाने मोठी खेळी खेळली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवावांसियांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

गोव्यासह पाच राज्यात निवडणुका होत असून, इतर राज्यांबरोबरच गोव्यातही राजकीय पक्षांनी मोर्चबांधणी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, आज मुख्यमंत्री तथा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या घोषणा केल्या.

पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, 'गोव्याच्या विकासासाठी विस्तृत आराखडा तयार केला आहे. गोवा सुंदर आहे, पण राजकीय नेते आणि पक्षांनी गोव्याला फक्त ओरबाडण्याचं काम केलं. ज्याला संधी मिळाली त्याने लुटण्याचं काम केलं. पण आम्ही गोव्याच्या विकाससाठी योजना बनवली आहे', अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

'काही दिवसांपूर्वी जेव्हा मी गोव्यात आलो होतो, तेव्हा या योजनेतील पहिल्या मुद्द्याची घोषणा केली होती. गोव्यात आपचं सरकार आलं, तर एक मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. ३०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत दिलं जाईल. जुने वीजबिल माफ केले जातील. शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा केला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे २४ तास वीज पुरवठा केला जाईल', असं केजरीवाल म्हणाले.

'मी जे बोलतो, ते करतो. मी नेता नाही. मला राजकारण करता येत नाही. आज मी गोव्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करणार आहे. गोव्यातील तरुण चिंतेत आहे. त्याच्याकडे रोजगार नाही. गोव्यात सरकारी नोकरी हवी असेल, तर राजकीय वशीला असावा लागतो, अशी माहिती मला मिळाली. आपचं सरकार आल्यास वशिलेबाजी बंद केली जाईल. दिल्लीत आम्ही हे करून दाखवलं आहे', असं केजरीवाल यांनी नमूद केलं.

'गोव्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला तरुणाला रोजगार उपलब्ध करून देणार. जोपर्यंत त्याला रोजगार मिळत नाही. तोपर्यंत त्याला दरमहा तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता दिला जाईल. ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांसाठी आरक्षित केले जातील. यात खासगी क्षेत्राचाही समावेश केला जाईल', असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

'गोव्यातील खाणीची कामं बाहेरच्या ठेकेदारांना दिलं जातं. ते त्यांचे लोक घेऊन येतात. पण, आमचं सरकार आलं, तर ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांसाठी आरक्षित केले जातील', अशी घोषणाही केजरीवाल यांनी केली.

'कोरोना काळात पर्यटनावर मोठा परिणाम झाला. पर्यटन क्षेत्रावर अवलंबून जी कुटुंब आहेत. जोपर्यंत त्यांना रोजगार मिळत नाही. तोपर्यंत त्या कुटुंबीयांना दरमहा ५००० रुपये दिले जातील. खाणींवर काम करणाऱ्या कुटुंबींयांना खाणी सुरू होईपर्यंत दरमहा ५००० हजार रुपये दिले जातील', अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

'दिल्लीत आम्ही कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन केलं आहे. त्याच धर्तीवर गोव्यात कौशल्य विकास विद्यापाठी निर्माण करू. त्यांना युवकांना बारावीनंतर प्रशिक्षण दिलं जाईल. ते काम करत शिक्षण घेऊ शकतील', असं केजरीवाल म्हणाले.

Related Stories

No stories found.