पाकिस्तानच्या सीमेवर धडकले बीडचे पोलीस, 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

एक वर्षापासून दोन्ही आरोपींच्या शोधात होते परळी पोलीस
पाकिस्तानच्या सीमेवर धडकले बीडचे पोलीस, 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक
(प्रातिनिधिक फोटो)

बीड जिल्ह्यातील परळी शहरातील पोलीसांनी थेट पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन धडक कारवाई केली आहे. एक वर्षापूर्वी परळी शहरातील व्यापाऱ्याला कमी दरात सोनं देतो म्हणून दोन आरोपींनी 40 लाखांना फसवलं होतं. गुजरातमधील भूज-कच्छच्या जंगलात कारवाई करुन पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे. ज्यामुळे परळीच्या पोलीस पथकाचं जिल्ह्यात कौतुक केलं जातंय.

मागच्या वर्षी परळी शहरातील व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भूज- कच्छ या ठिकाणी राहत असलेला मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी सुरुवातीस स्वस्तात सोने देतो म्हणून पाच लाखांचं सोनं दिलं. यावर शंकर शहाणे यांचा विश्वास बसला. पाच लाखांचं सोनं दिल्यानंतर आरोपीने शंकर शहाणे यांना आणखी सोन्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले.

40 लाख रुपये दिल्यानंतर पुढचे सहा महिने आरोपी शंकर शहाणे यांना दागिने देण्यासाठी टाळाटाळ करत राहिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. व्यापाऱ्यासोबत व्यवहार करताना दोन्ही आरोपींनी आपलं नाव बदलललं होतं. त्यामुळे त्यांचा शोध घेणं पोलिसांना कठीण जात होतं. या आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांनी मुंबई, नागपूर, अमरावती, बुलढाणा, भोकरदन, सोलापूर यासारख्या भागांमध्ये तपास केला.

अखेरीस आरोपी हे भूजपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या रतिया इथे एका फार्म हाऊसवर राहत असल्याचं बीड पोलिसांना समजलं. रतियापासून पाकिस्तानची सीमा फक्त 70 किलोमीटरवर आहे. याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने परळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in