मलिकांच्या अटकेवरून राजकारण तापलं! आज भाजपची, तर उद्या 'मविआ'ची राज्यभर निदर्शनं

चंद्रकांत पाटील : "शरद पवार नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय घेतात. कारण एका विशिष्ट समुदायाला दुखावणं त्यांना जमणार नाही."
मलिकांच्या अटकेवरून राजकारण तापलं! आज भाजपची, तर उद्या 'मविआ'ची राज्यभर निदर्शनं

ईडीकडून मलिकांना अटक केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. ईडीच्या कारवाईनंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर सडकून टीका केली आहे. तर भाजप आता मलिकांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाली आहे. मलिकांच्या राजीनाम्यांच्या मागणीसाठी भाजपकडून गुरुवारी, २४ फेब्रुवारी रोजी राज्यभर निदर्शन केली जाणार आहेत. तर दुसरीकडे मलिकांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शुक्रवारी आंदोलन, निदर्शनं केली जाणार आहेत.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर आज ईडीने अटकेची कारवाई केली. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून, महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी यावर टीका केली आहे. दुसरीकडे भाजपने मलिकांना अटक झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली असून, भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.

भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज उद्या राज्यभर निर्दशनं करणार असल्याची माहिती दिली. "महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक दुर्दैवी प्रसंग कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेऊन मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. मंत्री कोठडीत जाण्याचा हा दुसरा प्रसंग आहे."

"अनिल देशमुखांच्या वेळी शरद पवारांनी खूप हुशारीने राज्यभर आंदोलन होऊ नये. पक्षाची प्रतिमा डागाळू नये म्हणून तत्काळ राजीनामा घेतला, परंतु तेच शरद पवार नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय घेतात. कारण एका विशिष्ट समुदायाला दुखावणं त्यांना जमणार नाही. महाराष्ट्रातील स्वाभिमानी, राष्ट्रीय विचारांचा अभिमान बाळगणारी जनता हे सहन करणार नाही."

"२७ महिन्यात प्रत्येक गोष्ट भाजपला संघर्ष करूनच मिळवावी लागली. त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, नागरिकांना आवाहन करतो. हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे. हा राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यासाठी उद्याच नाही, तर मलिकांचा राजीनामा मिळेपर्यंत निदर्शनं केली पाहिजेत. आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे. 'हम करे सो कायदा' चालणार नाही. उद्या निदर्शनाच्या सुरुवातीला १९९३च्या बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना अभिवादन करून निदर्शनं करावीत असं मी सगळ्यांना आवाहन करतो," असं पाटील यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

"नवाब मलिकांवर अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. जोपर्यंत ते दोषी आहेत, हे सिद्ध होत नाही. तोवर राजीनामा घेणार नाही. विशिष्ठ हेतूने ही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आताच राजीनामा घ्यायला पाहिजे हे पटत नाही. खरं तर नारायण राणेंना अटक झाली होती. त्यांचा राजीनामा तुम्ही घेतलात का?", असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलेला आहे.

त्याचबरोबर या अटकेच्या निषधार्थ आता महाविकास आघाडीही निदर्शनं करणार आहे. "आज (२४ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या जवळ धरणं देणार आहे. शुक्रवारपासून (२५ फेब्रुवारी) पूर्ण राज्यात तीनही पक्षांकडून शांततेनं मोर्चा, आंदोलन केलं जाईल," असं भुजबळांनी म्हटलेलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in