मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल

मुंबईत लॉकडाऊन वाढणार का?, पाहा काय आहे मुंबई महापालिका आयुक्तांचं उत्तर!

BMC Commissioner Iqbal Singh Chahal Interview: मुंबईत लॉकडाऊन वाढणार की नाही? याबाबत आता स्वत: मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे. पाहा ही विशेष मुलाखत

मुंबई: मुंबईत (Mumbai) सध्या कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. अशावेळी मुंबईतील लॉकडाऊन (Mumbai Lockdown) शिथील होणार का? असा प्रश्न अनेक जण विचारु लागले आहेत. याचविषयी जाणून घेण्यासाठी 'मुंबई तक'ने मुंबई महापालिकेचे आयुक्त (BMC Commissioner) इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाऊन वाढणार की नाही या प्रश्नासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. वाचा मुंबई आयुक्तांची ही विशेष मुलाखत.

प्रश्न: मुंबईची परिस्थिती आता खरोखरच सुधारत आहे का?

आयुक्त इकबाल चहल: दुसरी लाट आपल्याकडे 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली. याला आता साधारण 78 दिवस झाले आहेत. या 78 दिवसापासून आपण संघर्ष करत आहोत. या दिवसात आपल्याकडे 3 लाख 18 हजार नवे कोरोना रुग्ण सापडले. या काळात 1453 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण जर आपण टक्केवारी पाहिली तर आपल्या इथला मृत्यूदर हा 0.4 टक्के एवढाच आहे.

1 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान आपण 11 लाख 91 हजार टेस्टिंग केली. याचा अर्थ आपण दररोज सरासरी 44 हजारांच्यावर टेस्टिंग करत आहोत. टेस्टिंग कमी नाही हे लक्षात घ्या. जर टेस्टिंग झाल्या नसत्या तर रुग्णालयातील गर्दी वाढली असती.

आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला आहे. याआधी 100 टेस्टमध्ये 31 जण पॉझिटिव्ह सापडत होते. आता हा आकडा साडे बारा टक्क्यांवर आला आहे. मागील आठवड्यात आपल्याकडे 4000 बेड्स रिकामे होते. आता 5200 बेड्स रिकामे आहेत. म्हणजेच रुग्ण कमी येत आहेत.

प्रश्न: गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांची संख्या अद्यापही जास्त आहे, हे धोकादायक आहे का मुंबईसाठी?

आयुक्त इकबाल चहल: जरी आपल्याकडे 5200 बेड्स उपलब्ध असतील तरी आयसीयू बेड्सबाबत आपल्यावर बराच ताण आहे. आयसीयूमध्ये रुग्ण आल्यानंतर अशा रुग्णांना बरं होण्यासाठी 2 किंवा 3 आठवडे कधीकधी 25 दिवस सुद्धा लागतात. त्यामुळे आयसीयू बेड्सवर ताण आहे. आज सकाळी आमच्याकडे 35 बेड्स रिकामे होते. पण हा आकडा कमी आहे. पण येत्या काही दिवसात आपण जम्बो सेंटर सुरु करत आहोत. त्यामुळे आपल्याकडे 800 पेक्षा अधिक आयसीयू बेड्स उपलब्ध होतील.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल
Free Vaccination: मोफत लसीकरणाच्या निर्णयातील 5 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

प्रश्न: मुंबईतील संचारबंदी, लॉकडाऊन कायम राहिल का? तुम्हाला काय वाटतं?

आयुक्त इकबाल चहल: काल आपल्या राज्यात 66 हजार नवे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. जरी मुंबईतील नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही 11 हजाराहून 4 हजारापर्यंत आलेली असली तरीही राज्यातील रुग्णांची आकडेवारी कमी झालेली नाही. जोवर संपूर्ण राज्यातील स्थिती स्थिर होत नाही तोवर आपण लॉकडाऊन शिथील करु शकत नाही. कारण तसं केल्यास राज्यातील स्थिती पुन्हा बिघडू शकते. असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी याबाबतचा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे आणि ते योग्य निर्णय घेतील.

प्रश्न: लसीकरणाबाबत आपण नेमकं काय करणार?

आयुक्त इकबाल चहल: 16 जानेवारी 2021 पासून आपल्या देशात जे लसीकरण सुरु झालं आहे तेव्हापासून याबाबत जो एकाधिकार आहे. म्हणजे कंपन्यांकडून लस घेणं आणि ते राज्यांना वितरित करणं हे सगळं केंद्र सरकारच्या अखत्यारित येतं. आज बीएमसी किंवा राज्य सरकार थेट एखाद्या कंपनीकडून किंवा टेंडर काढून लस घेऊ शकत नाहीए. तशा स्वरुपाचे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे आम्हाला जे लस मिळत आहेत त्यानुसारच लसीकरण सुरु आहे.

आज आम्हाला नवीन लस आलेल्या नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहे. ही जी स्थिती आहे ती आमच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. पण 1 मेपासून आता राज्य सरकार कंपन्यांकडून लस विकत घेऊ शकतात. त्यामुळे यानंतर लसीकरणाच्या मोहिमेला वेग येणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल
महाराष्ट्रात 1 मेनंतर Lockdown वाढणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

प्रश्न: 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील लोकांना जे लसीकरण करायचं आहे त्याबाबत राज्य सरकारकडून तुम्हाला तरी कोणती ठोस माहिती देण्यात आलेली आहे?

आयुक्त इकबाल चहल: महानगरपालिकांना थेट अधिकार देण्यात आलेले नाहीत टेंडर काढण्याचे. त्यामुळे आम्ही थेट लस मिळवू शकत नाहीत. आम्हाला राज्य सरकारमार्फतच जावं लागेल.

प्रश्न: कोरोनाच्या नियमांबाबतीत अशी कुठली गोष्ट आहे की मुंबईकडून उर्वरित महाराष्ट्राला शिकण्याची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं?

आयुक्त इकबाल चहल: मी गेल्या वर्षी जेव्हा मुंबई महापालिका आयुक्त म्हणून पदभार हाती घेतला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, सिस्टम बदलल्याशिवाय कोरोनाबाबतची परिस्थिती बदलता येणार नाही. त्यानंतर आम्ही वॉर रुम बरखास्त केली आणि 24 वॉर्ड वॉर रुम तयार केले. अशाप्रकारे आपण विकेंद्रीकरण केलं आणि यामार्फत आपण रुग्णांना बेड मिळवून देऊ लागलो.

खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स ताब्यात घेतले आणि त्यानुसार आपण ते रुग्णांना उपलब्ध करुन देऊ लागलो. त्यानंतर आम्ही लोकांचं प्रबोधन सुरु केलं. मास्क घातलं नाही तर आम्ही दंड सुरु केला. 27 लाख लोकांना यावेळी दंड ठोठावून 54 कोटी गोळा केले. यामुळे लोकांना शिस्त लागली. त्यामुळे मास्क न लावता फिरणारे फार कमी लोकं आपल्याला दिसतील.

त्याशिवाय आम्ही रुग्णांचं ट्रेसिंग हे पूर्णपणे सुरु केलं म्हणजे रुग्णाच्या रिपोर्टपासून ते त्याला बेड मिळेपर्यंत सगळ्या गोष्टी स्वत: महापालिकेने केल्या. त्याचा फायदा मुंबईकरांना झाला.

प्रश्न: 18 ते 44 वयोगटातील लोकांनी 1 मेपासून नोंदणी करायची की नाही? याबाबत आपण काही स्पष्टता देणार का?

आयुक्त इकबाल चहल: आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण उपलब्ध आहेत. पण ज्या लसी आहेत त्या थेट बीएमसी मिळवू शकत नाही नियमानुसार. पण लोकांनी आपलं रजिस्ट्रेशन करत राहायचं त्याबाबत काहीही हरकत नाही. एकदा मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली की, तर लसीकरणाची ही मोहीम आपल्याकडे जोरदार सुरु होईल. (bmc commissioner iqbal singh chahal interview on mumbai lockdown)

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in