
शामली (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका मुलीने पती आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी आरोपी मुलगी, जावई आणि इतर दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शामली येथील आहे. येथे 31 जानेवारी रोजी रामपूर खेडी गावाजवळील जंगलात 55 वर्षीय उषा देवी यांचा मृतदेह सापडला होता. पोलीस अधिकारी सुरती माधव यांनी सांगितले की, उषा देवी यांची मुलगी प्रियांकाने तिचा पती शिवम आणि राजेंद्र आणि नौशाद यांच्या मदतीने तिच्या आईची हत्या केली. त्यांनी उषा देवीची गळा आवळून हत्या केली होती.
वास्तविक, आरोपी प्रियांकाने तीन वर्षांपूर्वी आईच्या इच्छेविरुद्ध शिवमशी लग्न केले होते. उषा देवी या लग्नाच्या विरोधात होत्या. त्यामुळे त्यांनी हे लग्न स्वीकारण्यास नकार दिला. प्रियांकाला आईची ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती आणि त्यामुळेच तिने आपल्या आईला मारण्याचा कट रचला.
31 जानेवारी रोजी प्रियांकाने पती शिवम आणि दोन मित्रांच्या मदतीने आईचा गळा आवळून खून केला. त्यात उषा देवी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, उषा देवी यांचा मृतदेह सापडल्यापासून पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते. अखेर महिनाभरानंतर त्यांना या प्रकरणात यश मिळाले. पुराव्याच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.
फक्त आईचा लग्नाला असलेल्या विरोध या एकमेव कारणामुळे प्रियंकाने आपल्या आईची हत्या केली की, आणखी इतर कारणामुळे हत्या केली याचाही आता पोलीस तपास करत आहे.
पैशासाठी वडिलांची हत्या
त्याचवेळी दुसरीकडे 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील पालघरमध्ये 35 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. ज्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आरोपी मुलाने आपल्या वडिलांकडे काही पैसे मागितले होते. जे देण्यास वडिलांनी नकार दिला होता. यामुळे रागाच्या भरात मुलाने वडिलांचीच हत्या केली.
ही घटना जव्हार भागातील रंजनपाडा येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जानू माळी (70) याला सरकारी योजनेंतर्गत दरमहा काही रुपये मिळत होते. त्यांनी काही कामानिमित्त त्यांच्या बँक खात्यातून 900 रुपये काढले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा रवींद्र माळी त्यांच्याकडे ते पैसे मागू लागला. मात्र जानूने ते पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
आरोपी मुलाला वडिलांचे बोलणे पसंत न आल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत जानू गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला मोखडा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना नाशिक येथील रुग्णालयात पाठवावं लागेल असं सांगितलं. मात्र, रवींद्रने आपल्या वडिलांना नाशिकला नेण्याऐवजी घरी आणलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. आता याप्रकरणी मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.