बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल

लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) मागच्या आठवड्यात घरी पायऱ्या चढत असताना पाय घरसरून पडले होते
Former Bihar Chief Minister Lalu Prasad Yadav has been admitted to AIIMS Hospital in Delhi
Former Bihar Chief Minister Lalu Prasad Yadav has been admitted to AIIMS Hospital in Delhi

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे घराच्या पायऱ्या चढत असताना पाय घसरून पडले होते. त्यानंतर त्यांना पाटणा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही त्यामुळे आता त्यांना दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लालूप्रसाद यादव पाय घसरून पडल्याने त्यांना तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालं. ज्यामुळे त्यांना शरीराची हालचाल करता येत नव्हती. तसंच त्यांच्या फुफ्फुसांमध्येही पाणी भरलं आहे अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार लालूप्रसाद यादव यांना एम्स या दिल्लीतल्या रूग्णालयात आणण्यात आलं आहे. दिल्लीतल्या डॉक्टरांना लालूप्रसाद यादव यांची मेडिकल हिस्ट्री माहित आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर योग्य उपचार होतील असाही अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी वर्तवला आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यावर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. त्यांची मुलगी मीसा भारती या देखील लालूप्रसाद यादव यांच्यासोबत आहेत. लालूप्रसाद यादव यांना दिल्लीत उपचारांसाठी आणण्यात आलं तेव्हा विमानतळावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही उपस्थित होते. तसंच नितीश कुमार यांनीही लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली होती.

राजदचे नेते लालूप्रसाद यादव हे डायबेटिस, बीपी, पोस्टेटची वाढ, युरिक अॅसिड, उजव्या खांद्याचं हाड मोडणं, पायाची समस्या अशा अनेक आजारांशी लढत आहेत. मधुमेह झाल्याने त्यांच्या किडनी २५ टक्केच काम करत आहेत असंही डॉक्टरांनी सांगितलं. एकंदरीत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांना एम्स रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे असंही समजतं आहे.

लालूप्रसाद यादव यांचे समर्थक त्यांना बरं वाटावं, प्रकृतीला आराम पडावा म्हणून होम हवन तसंच पूजा करत आहेत. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य मिळावं म्हणून पाटण्याच्या अनेक मंदिरांमध्ये होम हवन केले जात आहे. यापूर्वी लालू प्रसाद यादन यांना किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला नेण्यात येणार होते. परंतु फ्रॅक्चरनंतर आता डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढची पावलं उचलण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in