NoroVirus : केरळात नोरोव्हायरसचे आढळले 13 रुग्ण; काय आहेत लक्षणं?
देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचं दिलासादायक चित्र असताना आता केरळातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली. केरळात एका पशु वैद्यकीय महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना संसर्गाचा प्रचंड वेग असलेल्या नोरोव्हायरसची लागण झाली आहे. वायनाड जिल्ह्यातील विथिरी परिसरात पुकोडे गावात हा विषाणू आढळून आला आहे. 13 विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांपूर्वी नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. नोरोव्हायरसचा […]
ADVERTISEMENT

देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचं दिलासादायक चित्र असताना आता केरळातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली. केरळात एका पशु वैद्यकीय महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना संसर्गाचा प्रचंड वेग असलेल्या नोरोव्हायरसची लागण झाली आहे. वायनाड जिल्ह्यातील विथिरी परिसरात पुकोडे गावात हा विषाणू आढळून आला आहे.
13 विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांपूर्वी नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. नोरोव्हायरसचा प्रसार झाल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही. या विषाणूबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणं आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्याचं काम केलं जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
सर्वात आधी महाविद्यालयाच्या परिसराबाहेर असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आल्याचं पशु वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितलं. त्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने विद्यार्थ्यांचे नमुने घेतले आणि अलाप्पुझा येथील एनआयव्ही (NIV) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. रिपोर्ट आल्यानंतर नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्याचं निप्षन्न झालं. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.