विद्यार्थ्याला पेन फेकून मारला; शिक्षिकेला निवृत्तीनंतर एका वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा

केरळमधील घटना : शिक्षिकेने तिसरीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांला पेन फेकून मारला होता, ज्यामुळे त्याला नजर गमवावी लागली...
विद्यार्थ्याला पेन फेकून मारला; शिक्षिकेला निवृत्तीनंतर एका वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा
प्रातिनिधीक छायाचित्र.

वर्गात गप्पा मारणाऱ्या विद्यार्थ्याला पेन फेकून मारणं एका शिक्षिकेला चांगलंच भोवलं. शिक्षिकेने विद्यार्थ्याला पेन फेकून मारला, पण त्यामुळे आता सश्रम तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तिरुवनंतपुरुम येथील न्यायालयाने शिक्षिकेला एका वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. निवृत्त झाल्यानंतर शिक्षिकेला तुरुंगात जावं लागणार आहे.

शेरिफा शहाजहान असं या शिक्षिकेचं नाव आहे. शिक्षिकेनं पेन फेकून मारल्यानंतर तो विद्यार्थ्याच्या डोळ्यावर लागला. यात त्याचा डाव्या डोळ्याची नजर गेली. याप्रकरणी पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिरुवनंतपुरूम येथील न्यायालयात सुनावणी सुरू होती.

न्यायालयाने या प्रकरणी शिक्षिकेला एक वर्षाचा सश्रम कारावास तसेच तीन लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

घटना नेमकी काय? कधी घडली?

सोळा वर्षापूर्वी ही घटना घडली होती. १८ जानेवारी २००५ रोजी वर्गात शिकवणी घेत असताना शिक्षिकेने अल अमीन या विद्यार्थ्याला पेन फेकून मारला. आठ वर्षाचा अल अमीन वर्ग शिकवणी सुरू असताना बोलत बसला होता.

फेकून मारलेल्या पेनमुळे विद्यार्थ्यांच्या डाव्या डोळ्याला छिद्रं पडले आणि त्याची नजर गेली. अल अमीनच्या डोळ्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या, पण त्याची नजर पुन्हा आली नाही. याप्रकरणी अल अमीनच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

शेरिफा शहाजहान यांना या घटनेनंतर सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, निलंबनाच्या एका महिन्यातच शिक्षिका पुन्हा कामावर रुजू झाली होती. दरम्यान, या प्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी फिर्यादींच्या वकिलांनी शिक्षिकेनं केलेलं कृत्य क्रूर असून, त्याला समाज स्वीकारू शकत नाही, असा युक्तिवाद करत कडक शिक्षेची मागणी केली होती.

Related Stories

No stories found.