किरीट सोमय्या हल्ला : सरकारबरोबर पोलिसांनाही आमची ताकद दाखवून देऊ; फडणवीस संतापले

attack on kirit somaiya : किरीट सोमय्या हल्ला प्रकरणावरून फडणवीसांचा पोलिसांवर गंभीर आरोप
किरीट सोमय्या हल्ला : सरकारबरोबर पोलिसांनाही आमची ताकद दाखवून देऊ; फडणवीस संतापले

खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांना झालेली अटक आणि किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करतानाच महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला. पुणे दौऱ्यात असताना त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालीसा म्हणण्यास शिवसैनिकांचा झालेला विरोध, त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेला या दोन्ही घटनांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "या लोकांचे जे जे घोटाळे बाहेर काढतील, त्यांना जिवे मारण्याची नवीन प्रवृत्ती यांनी सुरू केली आहे. या प्रवृत्तींना आम्ही घाबरणार नाही. जशास तसं उत्तर देण्यास सक्षम आहोत. आम्ही यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू," असा इशारा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला.

"आता प्रश्न एवढाच आहे की, किरीट सोमय्या हे झेड दर्जाच्या सुरक्षेत आहेत. सोमय्या यांनी पोलीस स्टेशनला अधिकृतरीत्या कळवलं होतं. 'मी भेटायला येतो आहे.' पोलीस स्टेशनमध्ये भेट झाल्यावर सांगितलं की, '७० ते ८० जणांचा जमाव बाहेर आहे आणि तो जमाव माझ्यावर हल्ला करणार आहे.' त्यांच्याकडून अधिकृत कळवण्यात आलं होतं की, माझ्यावर पोलीस स्टेशनच्या आवारात हल्ला होणार आहे. त्या संदर्भातील अगोदर क्लिअरन्स करा, त्यानंतर मी बाहेर जाईन."

"एवढं क्लिअर सांगितल्यानंतर देखील पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. उलट जाणीवपूर्वक त्यांच्यावर दगडफेक करायला शिवसैनिकांना, तेथील लोकांना, गुंडांना, परवानगी दिली. म्हणजे एकूणच पोलिसांच्या संरक्षणामध्ये गुंडागर्दी चाललेली आहे. खरं म्हणजे पोलिसांना लाज वाटायला पाहिजे. जर ते झेड प्लस सुरक्षेची माहिती दिल्यानंतरही त्यांना जर संरक्षण देऊ शकत नसतील. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा आहे."

"मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालवलेली आहे. देशातील सर्वोत्तम पोलीस यंत्रणा आज इतक्या दबावाखाली सरकारच्या नोकरासारखं वागत आहे. लोकशाही पायाखाली तुडवली जात आहे.ही परिस्थिती अतिशय भयावह आहे. एवढच नाही तर सर्व सेक्शन बेलेबल असताना देखील आणि रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही. हे माहिती असताना देखील कायदा पायदळी तुडवून, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व नियम पायदळी तुडवून, त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे हा एकूणच गंभीर प्रकार आहे.

"मी गृहमंत्री आणि गृह सचिवांना पत्र लिहणार आहे. या प्रकरणातील पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करणार आहे. जे पोलीस एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. त्यांच्यासमोर अशा प्रकारचे हल्ले होत असतील, तर हे खपवून घेतले जाणार नाही."

"आज सरकारला इशारा देऊ इच्छितो की, आम्हाला घाबरू शकत नाही. आम्ही घाबरू असं समजू नका. आम्ही कायदा आणि सुव्यवस्था पाळतोय, याचा अर्थ तुम्ही आमच्यावर हल्ले कराल असा होत नाही. जशास तसा जवाब देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. जर पोलिसांना हे पाहायचे असेल तर त्यांना देखील आमची ताकद दाखवून देऊ शकतो. त्यामुळे हे जर तत्काळ बंद केलं नाही. तर यावर आम्ही देखील लढाई केल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा फडणवीसांनी सरकार आणि पोलिसांना दिला.

"एका महिलेला हे इतकं घाबरले की, हजारो लोक त्याकरता जमा करावे लागले. पोलिसांची मदत घ्यावी लागली. खोट्या केसेस टाकाव्या लागल्या. एका महिलेला आणि हनुमान चालीसा याला विरोध करण्याकरता अख्खी मुंबई वेठीस धरण्याचं काम यांनी केलं आहे," असा आरोप फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Related Stories

No stories found.