पुण्यातील स्पा सेंटरवर कारवाई... फडणवीस सरकार आता आणणार स्पा सेंटरसाठी नवे नियम
पुण्यातील स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आल्यानंतर मानवी तस्करीचा गंभीर प्रकार हा उघडकीस आला. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून लवकरच नवी नियमावली लागू होणार असल्याचं विधान परिषदेत जाहीर करण्यात आलं.
ADVERTISEMENT

मुंबई: पुण्यातील विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत मानवी तस्करीचे गंभीर प्रकरण उघडकीस आल्याने राज्य शासनाने स्पा सेंटरसाठी कडक नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन नियमावली तीन ते चार महिन्यांत लागू केली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (शहरी) योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य अमित घोडके यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती.
स्पा सेंटरसाठी नेमके कोणते नवे नियम आणणार सरकार?
याच लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “पुण्यातील विमाननगर येथील स्पा सेंटरवर डमी ग्राहकाच्या (decoy customer) माध्यमातून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत काही परदेशी महिलाही आढळल्या. अशा स्पा सेंटरच्या माध्यमातून मानवी तस्करी आणि बेकायदेशीर वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे प्रकार राज्यातील विविध शहरांमध्ये वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून स्पा सेंटरसाठी नवीन नियमावली तयार केली जात आहे.”
हे ही वाचा>> मामीसोबत अनैतिक संबंध... बहिणीसोबत लग्न आणि सासू-मेव्हण्याची हत्या, पार चक्रावून टाकणारी कहाणी
नव्या नियमावलीत स्पा सेंटर सुरू करण्यासाठी गृह विभागाची पूर्व अनुमती (NOC)बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांची संपूर्ण पार्श्वभूमी तपासणी, कडक निकष आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी विशेष तरतुदी केल्या जाणार आहेत. विशेषतः महिलांना आणणाऱ्या एजंट्स आणि दलालांवर थेट कारवाई करून मानवी तस्करीचे रॅकेट पूर्णपणे मोडीत काढण्यावर भर देण्यात येईल, असे राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले. या चर्चेत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनीही सहभाग घेतला.
पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर व्यवसाय वाढत आहेत. ऑनलाइन माध्यमांद्वारेही हे रॅकेट चालवले जात असल्याने कठोर उपाययोजना आवश्यक आहेत.










