उद्धव ठाकरे आणि संजय पांडेंना माझा मनसुख हिरेन करायचा; सोमय्याचा गंभीर आरोप

Kirit somaiya press conference : मुंबई पोलीस आयुक्त हल्ल्याला जबाबदार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे...
उद्धव ठाकरे आणि संजय पांडेंना माझा मनसुख हिरेन करायचा; सोमय्याचा गंभीर आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काल झालेल्या हल्ल्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय पांडे यांना माझा मनसुख हिरेन करायचा आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सोमय्या म्हणाले, "काल पोलीस स्टेशनजवळ माझ्यावर जो हल्ला झाला, तो ठाकरे सरकार पुरस्कृत हल्ला होता. मी पोहोचण्याआधीच पोलीस ठाण्याला कळवलं होतं की, रात्री ९.३० वाजता येईल. मी पोहोचण्यापूर्वीच ७० ते ८० शिवसैनिक तिथे आलेले होते. पोलीस ठाण्याच्या दाराजवळ जमले होते.

"पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ केली. परत जाताना पोलिसांना सांगितलं की, माझ्यावर हल्ला केला जाणार आहेत. पोलीस म्हणाले आम्ही जबाबदारी घेतली आहे, पण गेट उघडताच गुंडांनी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं. हे पाप उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांचं आहे. याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत," असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला.

"पोलीस म्हणाले सगळ्यांना हटवलं आहे, मग एव्हढे गुंड कसे काय जमू शकतात? सतत मुख्यमंत्री कार्यालयातून खार आणि वांद्रे पोलिसांना फोन जात होते. वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला. त्यात लिहिलंय शिवसैनिक १०० मीटर आणि तीन किलोमीटर दूर आहेत. हे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितलं."

"माझ्या गाडीवर लांबून दगड आला हे माझ्या नावाने पांडेंनी लिहिलं. मॅनिप्यलेटेड एफआयआर आहे. मी सही करणार नाही, असं सांगितलं. हा फेक एफआयआर आहे. पण त्यांनी हा एफआयआर ऑनलाइन पाठवला. खरे तर मी चार इंचावर होतो. दगड लागला असता, तर माझा डोळा गेला असता," असं सोमय्या म्हणाले आहेत.

"ठाकरे सरकारच्या पोलिसांकडून गुंडगिरी केली जात आहे. शिवसैनिकांनी पोलिसांच्या संगनमताने हल्ला केला. मी वांद्रे पोलिसांना पत्र दिलं आहे. खार पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांनी माझा जिव घेण्याचा प्रयत्न केल्याचं पत्रात म्हटलेलं आहे. कालचा हल्ला उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घडवून आणला होता," असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

"उद्या भाजपचं एक शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार. पोलिसांचा माफियासारखा उपयोग करायचा आणि किरीट सोमय्यांचा मनसुख हिरेन करण्याचा डाव पोलीस आयुक्त संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंचा आहे. माझी सकाळीच कॅबिनेट सचिवांशी चर्चा झाली आहे. त्यांनी गृह सचिवांना यामध्ये लक्ष घालण्यास सांगितलं आहे," असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला.

Related Stories

No stories found.