आदित्य ठाकरे किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर, बंदूक काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्या खांद्यावर

अस्लम शेख यांच्या कथित अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला बेकायदेशीररित्या परवानगी दिल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी
Kirit Somaiya-Aditya Thackeray
Kirit Somaiya-Aditya Thackeray Mumbai Tak

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार आदित्य ठाकरे हे सध्या भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. पावसाळी अधिवेशनातही याबाबतचे चित्र पाहायला मिळाले. अशातच माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आपला मोर्चा आदित्य ठाकरे यांच्याकडे वळविला आहे. मात्र यासाठी त्यांनी बंदुक काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख यांच्या खांद्यावर ठेवली आहे.

आज सोमय्या यांनी भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर यांच्यासह अस्लम शेख यांच्या कथित अनधिकृत स्टुडिओची पाहणी केली. तसेच तिथे ठिय्या आंदोलन करुन कथित अनधिकृत स्टुडिओचे बांधकाम केल्याप्रकरणी अस्मल शेख यांच्यावर आणि बेकायदेशीररित्या परवानगी दिल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली. सध्या स्टुडिओ बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मंगळवारी (23 ऑगस्ट) सोमय्या यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन कारवाईची मागणी केली होती. तसेच याबातचे ट्विट देखील केले होते.

काय आहेत किरीट सोमय्यांचे आरोप?

गेल्या 2 वर्षात अस्लम शेख यांनी मालवणी मड या भागात तब्बल 28 फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम सुरु केले आहे. यातील 5 स्टुडिओ हे सी. आर. झेड झोनमध्ये आहेत. 2019 ला ही जागा हिरवीगार होती, मात्र 2021 मध्ये हा परिसर सी. आर. झेडमध्ये नाही असे पर्यटन विकास मंडळाने म्हटले आहे. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवण्यात आली आहे.

मात्र मंग्रोवस झाडांची कत्तल करुन स्टुडिओ उभारण्यात आले आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्यांच्या दाव्यानुसार, पर्यावरण मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे 10 लाख स्केअर फुटची जागा मोकळी करून 28 स्टुडिओ बांधण्यात आले. भाटीया स्टुडिओची 3 एकर जागा कागदावर दिसते, परंतु खरे बघितले तर अधिकची 2 एकर जागा वापरून फिल्म सेट ऐवजी फिल्म स्टुडिओ बांधकाम केले.

आदित्य ठाकरेंवरही किरीट सोमय्यांचे आरोप

सोमय्या यांनी आज बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप केले. ते म्हणाले, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या बाजुच्या प्लॉटला भेट दिली होती. 28 फिल्म स्टुडिओंचे कमर्शिअल बांधकाम, 10 लाख स्क्वेअर फुटची जागा मोकळी करुन केले आहे. यासाठी यासाठी पर्यावरण मंत्रालयानं याकरीता परवानगी अधिकृत परवानगी दिली होती. पण मी विचारतो आदित्य ठाकरे यांनी यासाठी परवानगी दिलीच कशी? त्यांनी दिलेली परवानगी बेकायदेशीर आहे.

आरे संदर्भात एवढे रान उठवले, धत्तिंग केले, मग इथे तुम्हाला पर्यावरण दिसले नाही का? या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारनं यासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. कोव्हिड काळात बांधकाम केले हे आदित्य ठाकरेंना दिसलं नाही का? तिकडे परबचा रिसोर्ट तुटणार आणि इकडे अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाचे स्टुडिओ तुटणार, असा दावाही सोमय्या यांनी केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in