चंद्रकांत पाटलांच्याही तोंडाला तसा फेस आला होता; शिवसेनेचा ‘ईडी’वरून भाजपवर पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. सोमय्यांनी भ्रष्टाचाराचा दुसरा आरोप केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल’, असं म्हटलं. पाटलांच्या या विधानावरून शिवसेनेनं भाजपवर पलटवार केला आहे.

ईडी, सीबीआय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांना खडेबोल सुनावले आहेत.

”ईडी’, ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असं महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे व तसे धमकीसत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की, हे लोक फक्त ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’च्याच नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ”ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल.” पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला?’, असं खोचक सवाल शिवसेनेनं केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘कोल्हापुरातून पळ काढावा लागला’

‘हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार सोमय्या यांनी काही आरोप केले आहेत. हे आरोप चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने केले असावेत अशी मुश्रीफ यांना खात्री आहे, कारण आरोप करणाऱ्या दोघांच्याही तोंडी ‘ईडी’चे नाव आहे. मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता. निवडणुकांच्या आखाडय़ात हे व्हायचेच. प्रश्न तो नसून केंद्रीय तपास पथकांच्या राजकीय गैरवापराचा आहे’, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘ईडीशी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ”आमची ‘वर’ सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो,” अशी भाषा पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. ”केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करू” ही त्यांची नियत आहे व महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही. शरद पवार यांनी मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटनप्रसंगी नेमकी तीच खंत व्यक्त केली आहे. पवार यांची ही खंत योग्यच आहे. सुसंवाद संपला आहे व राजकारण द्वेषाचे व अहंकाराचे झाले आहे’, अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

‘ईडी व सीबीआयच्याच बाता मारतात!’

‘महाराष्ट्रातील भाजपचे लोक संसदीय लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहेत. राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवून थेट दिल्लीच्या कानात बोटे घालीत आहेत. राज्यपालांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत प्रत्येक जण महाराष्ट्र सरकारला शत्रू मानून वागत आहे. राज्य खिळखिळे करायचे, राज्याची गती रोखायची, बेबंद आरोप करून खळबळ माजवायची हेच त्यांचे धोरण आहे. एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात!’, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

या सरकारकडे पैसे खाण्याचंही स्किल नाही, या पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेना म्हणाली, ‘चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात. एकतर ते ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या संस्थांना बदनाम करीत आहेत. या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल असे त्यांचे वर्तन आहे. दुसरे एक गंभीर विधान पाटलांनी केले. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही. पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची ‘पीएच.डी.’ त्यांनी केली असावी. त्यामुळे ‘ईडी’ने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा व आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडास फेस आणायला हवा.’

ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही

‘स्वतः फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे प्रशासन त्यांना माहीत आहे. ज्या प्रशासनाकडून त्यांनी कारभार केला तेच प्रशासन आजही आहे. पुन्हा प्रशासनातले अधिकारी विरोधी पक्षनेत्यांना गोपनीय रीतीने भेटत असतात हा स्फोट त्यांनीच केला आहे. मग ऊठसूट ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या धमक्या का देता? केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय? महाराष्ट्रातील मंत्र्यांवर, सरकारवर आरोप करणाऱ्याला केंद्र सरकार लगेच ‘झेड’ दर्जाची केंद्रीय सुरक्षा पुरवून स्वतःचेच हसे करून घेते. सत्य असे आहे की, ‘ईडी’मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे.

‘जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे काय?’

‘भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यातील अनेकांनी त्यांना कोर्टात खेचले आहे. कोल्हापूरचा पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही. सोमय्या कोल्हापुरात पोहोचले असते तर कोल्हापूरकरांच्या दैवतांवरही त्यांनी आरोप केले असते. ते उठता बसता, जागेपणी, झोपेतही आरोप करतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था व पोलिसांवर ताण वाढतो. विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल. विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे काय? एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले’, असं टीकास्त्र शिवसेनेनं डागलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT