रायगडमध्ये AK47 रायफल्ससह सापडलेली बोट कोठून आली?; बोटीचं ऑस्ट्रेलियाशी काय कनेक्शन?

रायगड जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर एक दुर्घटनाग्रस्त बोट आढळली, ज्यात शस्त्रास्त्र होती. या बोटीमुळे सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Yacht with AK-47, explosives found in Raigad Maharashtra
Yacht with AK-47, explosives found in Raigad Maharashtra

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या हरिहरेश्वर येथील समुद्रात एक बोट (यॉट) आढळून आल्यानं राज्यासह देशभरातील यंत्रणा सतर्क झाल्या. समुद्रात आढळून आलेल्या या बोटीत एके ४७ रायफल्स आणि त्यांचा दारुगोळा आढळून आला. त्यामुळे राज्यातील पोलीस प्रशासनासह सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या.

पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच ही घटना समोर आली. त्यामुळे विधानसभेत आमदार आदिती तटकरे यांनी याकडे लक्ष वेधलं. त्यावर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबद्दलची सविस्तर माहिती घेऊन सभागृहात निवेदन केलं.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याबद्दलची माहिती दिली. फडणवीस म्हणाले, "१८ ऑगस्ट २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हद्दीत हरिहरेश्वर येथील समुद्री किनाऱ्यावर १६ मिटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या बोटीची तपासणी केली. त्यात तीन एके ४७ रायफल्स आणि रायफल्ससाठी लागणारा दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली."

"ही घटना समोर आल्यानंतर तातडीने किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाला आणि इतर संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

रायगडमध्ये सापडलेली बोट कुणाच्या मालकीची?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दुर्घटनाग्रस्त अवस्थेत आढळून आलेल्या बोटीचे ना लेडीहान असं आहे. या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लाँर्डरगन या महिलेकडे आहे. या महिलेचा पती जेम्स हॉबर्ट हा सदर बोटीचा कॅप्टन आहे.

जूनमध्ये युरोपकडे जाणारी बोट ऑगस्टमध्ये कोकण किनारपट्टीवर कशी पोहोचली?

ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. २६ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास बोटीचे इंजिन निकामी झाले आणि बोटीवरील खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्याच दिवशी १ वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्ध नौकेनं बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सोडलं.

समुद्र खवळलेला असल्याने लेडीहान बोटीचं टोईंग करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौक हरिहरेश्वर किनाऱ्यावर लागली, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाने दिल्याचं फडणवीस म्हणाले.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश

या बोटीबद्दलची माहिती देतानाच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोन्ही मिळून करत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय यंत्रणा यांच्याशी सतत संपर्क चालू असून, बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in