Pegasus : Rahul Gandhi, प्रशांत किशोर यांचे फोन टॅप, 'हे' दोन केंद्रीय मंत्रीही रडारवर

दोन केंद्रीय मंत्र्यांची नावंही आली समोर
Pegasus : Rahul Gandhi, प्रशांत किशोर यांचे फोन टॅप, 'हे' दोन केंद्रीय मंत्रीही रडारवर

पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware ) वरून संसदेत आज बराच गदारोळ झाला. आता याप्रकरणी आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेगासस स्पायवेअरच्या मदतीने हेरगिरी झाल्याच्या आरोपांच्या आगीत आता महत्त्वाच्या नावांच्या यादीचं तेल ओतलं गेलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे फोन टॅप झाल्याचं वृत्त आहे. एवढंच नाही तर अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल या दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोनही टॅप झाले आहेत असं समजतं आहे. द वायरने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. लिक झालेल्या डेटामध्ये 300 भारतीय मोबाईल नंबर आहेत. त्यापैकी 40 मोबाईल नंबर हे भारतातील पत्रकारांचे आहेत असंही या अहवालात म्हटलं आहे. या सगळ्या मोबाईल क्रमांकांवर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाळत ठेवण्यात आली होती असंही सांगण्यात आलं आहे.

पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचाही फोन टॅप करण्यात आला आहे. प्रशांत किशोर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तेव्हा भाजपचं सरकार आलं होतं. त्यानंतर भाजपच्या विरोधी पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच सध्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडुत एमके स्टॅलिन यांच्या विजयात प्रशांत किशोर यांचं मोलाचं योगदान होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाचा अभिषेक बॅनर्जी हाही निशाण्यावर असल्याचं सांगण्यात आलं आहे. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा नंबर यात आहे. हा नंबर ते 2019 पूर्वी वापरत होते.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया याच्या पीएसचा नंबरही या यादीत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी वसुंधरा राजे असताना हेरगिरी केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे ओएसडी संजय काचरू यांचंही नाव या यादीत आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडिया यांचा नंबर सुद्धा इस्रायली सॉफ्टवेअरच्या डेटाबेसमधून मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Pegasus : Rahul Gandhi, प्रशांत किशोर यांचे फोन टॅप, 'हे' दोन केंद्रीय मंत्रीही रडारवर
काय आहे Pegasus Spyware? ते कसं काम करतं आणि WhatsApp कसं हॅक करतं?

राहुल गांधी यांनी काय म्हटलं आहे?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरून ट्विट केलं आहे. We know what he’s been reading- everything on your phone! #Pegasus असं म्हणत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. पेगासस स्पायवेअरच्या मदतीने मोदी सरकारमधले मंत्री, खासदार, आरएसएसचे नेते या सगळ्यांच्या फोनचं टॅपिंग करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने काय म्हटलं?

केंद्र सरकारने हे सगळे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये येणारे या बातम्या चुकीच्या आहेत. कोणत्याही प्रकारचं टॅपिंग किंवा काही करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारत हा एक बळकट लोकशाही असलेला देश आहे. आपल्या देशातील सगळ्या नागरिकांचे मौलिक अधिकार आणि खासगीकरणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

काय आहे Pegasus Spyware?

पेगासस स्पायवेअर हे इस्रायलच्या NSO ग्रुपने विकसित केलं आहे. ही कंपनी सायबर वेपन कंपनी म्हणून जगप्रसिद्ध आहे. ही कंपनी चर्चेत आली ती 2016 मध्ये. त्यावेळी एका अरब कार्यकर्त्याला त्याच्या मोबाईलवर एक संशयास्पद मेसेज आला होता. त्यावेळी त्याला हे वाटत होते की पेगाससद्वारे आयफोन वापरकर्त्यांचे फोन हॅक केले जात आहे. यानंतर अनेक दिवस गेले, ज्यानंतर Apple कंपनीने iOS चं अपडेटेड व्हर्जन आणलं. त्यावेळी त्यांनी हा दावा केला की आम्ही यातल्या त्या सगळ्या कमतरता दूर केल्या आहेत ज्या पेगाससद्वारे हॅक केल्या जाऊ शकतात.

या सगळ्या प्रकाराला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही बाब लक्षात आली की पेगासस स्पायवेअर हे अँड्रॉईड फोनही सहज हॅक करू शकतं. सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. त्यानंतर 2019 मध्ये फेसबुकने (Facebook) NSO ग्रुपच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in