स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा; तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

कापूस-सोयाबीन भाववाढीसाठी उपोषण : पोलिसांच्या गाडीवर हल्ला; रविकांत तुपकरांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा, एकाने केला
स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा; तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीत पोलिसांच्या गाडीचं झालेलंं नुकसान.

-जका खान, बुलढाणा

सोयाबीन आणि कापसाचे भाव पडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग उपोषणाचा चौथा दिवस असून, परिस्थिती चिघळताना दिसत आहे. उपोषणाला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात न आल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसाच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडली. त्याचबरोबर तहसीलदारांची गाडी जाळण्याचाही प्रयत्न झाला. याचे पडसाद आता वाशिम जिल्ह्यातही उमटताना दिसत आहे.

कापसाला प्रति क्विंटल 12 हजार रुपये, तर सोयाबीनला प्रति क्विंटल 8 हजार रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे.

तुपकरांच्या घरासमोरील पोलिसांचा फौजफाटा.
तुपकरांच्या घरासमोरील पोलिसांचा फौजफाटा.

उपोषणाचा चौथा दिवस असून, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते संतापले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (19 नोव्हेंबर) रात्री 8 वाजता 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झडप झाली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीच्या काचा फुटून नुकसान झालं आहे.

दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचं झालेलं नुकसान.
दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचं झालेलं नुकसान.

अचानक झालेल्या घटनेनंतर रविकांत तुपकर यांनी समोर येत कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं. दगडफेकीपूर्वी एका कार्यकर्त्यांनी पेट्रोल ओतून पेटून घेण्याचाही प्रयत्न केल्याचीही घटना घडली. मात्र, इतरांनी वेळीच त्याला आवरलं.

कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करताना रविकांत तुपकर.
कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करताना रविकांत तुपकर.

दगडफेक आणि पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रात्री 11 वाजता तहसीलदारांची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन दक्ष झालं असून, अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर रविकांत तुपकर यांच्या घराच्या परिसरातही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बुलढाणा जिल्ह्याबाहेरूनही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात याचे पडसाद उमटल्याची माहिती असून, परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in