पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय, कपील सन्सवर ८९ धावांनी मात

मुंबई तक

पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’च्या संघाने MCA मेंस कॉर्पोरेट स्पर्धेत कपील सन्स संघावर ८९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

ADVERTISEMENT

punit balan cricket academy team registered a resounding 89 run victory over kapil Sons team in mca men corporate tournament pune
Punit Balan Cricket Academy
social share
google news

पुणे: एमसीए मेंस कॉर्पोरेट शिल्ड टूर्नामेंट २०२५-२६ अंतर्गत खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’च्या संघाने दमदार फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर कपील सन्स संघावर ८९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा विजय

पुण्यातील स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीने निर्धारीत ५० षटकांत तब्बल ४०४ धावांचा अक्षरशः डोंगर उभा केला. संघाच्या या धावसंख्येत पवन शहा आणि सचिन ढास यांनी केलेली शतकी खेळी निर्णायक ठरली. सलामीला आलेल्या हर्ष मोगवीरा (३०) आणि पवन शहा यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली.

हे ही वाचा>> पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा, BCCI स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू

पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर पवन शहा आणि सचिन धस यांनी मैदान गाजवत दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १५१ धावांची दीर्घ भागीदारी केली. शहा याने १०१ चेंडूत ११ चौकार ठोकत १०१ धावा करीत शतक ठोकले तर त्याला दमदार साथ देत धस यानेही ९५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांची आतिषबाजी करत शतक (१०१) झळकावले. सामन्याच्या शेवटच्या षटकांत सिद्धार्थ म्हात्रे याने आक्रमक फलंदाजी करत ३४ चेंडूत ५० धावा केल्या. त्यामुळे संघाने ४०० चा टप्पा पार करत ७ बाद ४०४ अशी भक्कम धावसंख्या उभारली.

‘पुनीत बालन ग्रुप’ने उभारलेल्या ४०५ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना कपील सन्स संघाने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र ठराविक अंतराने विकेट पडल्याने विजयी लक्ष्य गाठण्यात हा संघ अपयशी ठरला. संघाकडून सिद्धेश वीरने ३८ चेंडूत ५१ धावा, नीरज जोशी अनुराग कवाडे यांनी प्रत्येकी अर्धशतक (५० धावा) करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आवश्यक धावगतीचा दबाव आणि पुनीत बालन अकॅडमीच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर कपील सन्स संघाचा ४४.५ षटकांत ३१५ धावांवर खेळ आटोपला. त्यामुळे पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीने कपील सन्स वर ८९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनुराग कवाडे यांनी आपल्या कारकिर्दीतील १५०० धावांचा टप्पा पूर्ण केला. सामन्याचे पंच म्हणून अक्षय पवार, महेश सावंत, नवीन माने यांनी काम पाहिले.

हे वाचलं का?

    follow whatsapp