हिमालयाच्या उंचीचा कलाकार काळाच्या पडद्याआड, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचं निधन
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे आज (18 डिसेंबर) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख देणाऱ्या कलावंताच्या निधनाने कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT

नोएडा: जगातील सर्वात उंच प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे शिल्पकार, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. राम सुतार यांनी बुधवारी रात्री नोएडा येथील सेक्टर-१९ मधील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकला आणि संस्कृती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
राम सुतार यांचे पुत्र आणि स्वतः कुशल शिल्पकार असलेले अनिल सुतार यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने कला विश्वातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
राम सुतार यांचा जीवनप्रवास
राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात एका गरीब कुटुंबात झाला होता. वडील वनजी हंसराज हे सुतार आणि शिल्पकार होते. लहानपणापासूनच शिल्पकलेची आवड असलेल्या राम सुतार यांनी मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले आणि तेथे मॉडेलिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
हे ही वाचा>> कोल्हापूर : कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल
1959 मध्ये ते दिल्लीला स्थायिक झाले आणि स्वतंत्र शिल्पकार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी 50 हून अधिक भव्य शिल्पे साकारली, ज्यात महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे पुतळे समाविष्ट आहेत.










