…अन् केशवराव धोंडगेंमुळे बाळासाहेब ठाकरेंची अटक टळली; छगन भुजबळांनी सांगितला तो किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी १७ जुलै रोजी वयाची शंभरी पूर्ण केली. यानिमित्ताने विधानसभेत छगन भुजबळ यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. केशवराव धोंडगे हे पंतप्रधानांनाही ठणकावून सांगणारं व्यक्तिमत्त्व आहे, अशा शब्दात भुजबळांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची अटक कशी केशवराव धोंडगे यांच्यामुळे टळली होती, याचाही किस्सा भुजबळ यांनी सभागृहात सांगितला.

ADVERTISEMENT

छगन भुजबळ केशवराव धोंडगेंबद्दल काय म्हणाले?

विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार केशवराव धोंडगे यांची वादळी कारकीर्द महाराष्ट्राने पाहिलीये. त्यांनी वयाची शंभर वर्ष पूर्ण केलीये. कायम आपल्या पक्षाबरोबर राहणारे, परखड भूमिका, अभ्यासू भाषणं आणि त्याला आंदोलनाची जोड देणारे, सरकार कुणाचंही असो सरकारला सळो की पळो करून सोडणारे असे धोंडगेसाहेबांनी १७ जुलैला वयाची १०० वर्ष पूर्ण केली.”

“मन्याड खोऱ्याचा वाघ, अशी त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. मला त्यांच्यासोबत करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे. बोलायला उभे राहिले की त्यांची तोफ सुरू व्हायची. छत्रपती शिवाजी महाराज, आंदोलनं यावर ते भरभरून बोलायचे. केशवराव धोंडगे हे कधी काय बोलतील आणि कधी काय करतील यांचा नेम नसायचा”, असं छगन भुजबळ सभागृहात म्हणाले.

हे वाचलं का?

शरद पवारांचा केशवराव धोंडगे यांनी घेतला होता मुका

“नांदेडमधील एका कार्यक्रमात केशवराव धोंडगे यांनी शरद पवार यांच्या गालाचा मुकाच घेतला. लोकांना वाटलं मुका घेतला, पण भाषण करताना मात्र त्यांनी शरद पवारांविरुद्ध प्रखर टीका केली. लोकांना याचीही कल्पनाही नव्हती. न्यायासाठी काहीही करण्याची त्यांची वृत्ती होती.”

“तब्बल सहा वेळा ते विधानसभेत निवडून आले होते. विद्वान होते. ११ मुख्यमंत्री त्यांनी पाहिलेत. ४० पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. विधिमंडळात केलेली भाषणं, त्यातील कोट्या, लक्षवेधी या सगळ्या आयुधांचा वापर करून ते भल्याभल्यांची भंबेरी उडवायचे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

ADVERTISEMENT

“केशवराव धोंडगे यांनी मोरारजी देसाईंनाही ठणकावलं होतं”

मोरारजी देसाई यांच्यासोबतचा केशवराव धोंडगे यांचा एक प्रसंग छगन भुजबळ यांनी सभागृहात ऐकवला. “एकदा त्यावेळचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनाच त्यांनी ठणकावलं होतं. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार कापसाच्या मुद्द्यासंदर्भात मोरारजी देसाई यांना भेटायला गेले होते. मोरारजी देसाई खासदारांना म्हणाले, ‘शहाणपणाचं बोला, दलाली करू नका.’ त्यावर केशवराव धोंडगे म्हणाले होते, ‘आम्ही बळीराजाचे प्रतिनिधी म्हणून इथे आलोय. बळीराजाने निवडून आलोय. तुमचे फोटो लावून विजयी झालेलो नाही. पंतप्रधानपदाला शोभेल असं बोला.’ पंतप्रधानांनाही ठणकावणारे केशवराव धोंडगे होते.”

ADVERTISEMENT

केशवराव धोंडगे, शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरेंची अटक

“मी एक गोष्ट सांगतोय, जी कदाचित अनेकांना माहिती नाही. त्यावेळी शीख धर्मियांच्याविरुद्ध बाळासाहेब ठाकरेंनी एक टिप्पणी केली होती. त्यामुळे शीख धर्मियांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यावेळी शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. ते अतिशय कडक आणि नियमाने चालणारे होते. घाबरणारे नव्हते. त्यांनी निर्णय घेतला की बाळासाहेब ठाकरे यांना अटक करायची.”

ही गोष्ट कानोकानी आमच्या शिवसेनेच्या गोटामध्ये पोहोचली. त्यावेळी मनोहर जोशी, नवलकर मला म्हणाले की, ‘बाळासाहेबांनी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक होणार. काहीतरी करायला पाहिजे.’ हे शंकरराव चव्हाण यांना कसं सांगायचं आणि मग माझ्या डोक्यात कल्पना आली. त्यानंतर मी केशवराव धोंडगेंना भेटलो.

त्यांना सांगितलं. त्याचबरोबर यापूर्वी बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर मुंबई कशी तीन दिवस जळत होती. तेही सांगितलं. त्यावर ते म्हणाले काळजी करू नको. सभागृह सुरू झालं. केशवराव धोंडगे उभे राहिले आणि म्हणाले मला बोलायचं आहे.

केशवराव धोंडगे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय, आम्हाला असं कळलंय की तुम्ही असा काही निर्णय (बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा निर्णय) घेतला आहे. तुम्हाला कल्पना आहे की, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली, तेव्हा तीन दिवस मुंबई जळत होती. तुम्ही असा परत निर्णय घेणार आणि मुंबई-महाराष्ट्राला वेठीस धरू पाहत आहात का? तुम्ही याचा फेरविचार केला पाहिजे. टिप्पणी केली असेल, मीटिंग घ्या, दोन्हीकडील लोकांना बोलवा, पण असा निर्णय घेऊ नका आणि मुंबई, महाराष्ट्राला अडचणीत आणू नका.”

“केशवरावांच्या भाषणानंतर प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या शंकरराव चव्हाणांसारख्या नेत्याने आपला निर्णय मागे घेतला आणि त्यावेळी घडणारा प्रसंग टळला. तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेलाय. आज यानिमित्ताने आठवला”, असा किस्सा छगन भुजबळ यांनी सभागृहात सांगितला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT