घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवू नये-उद्धव ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंदुत्व सोडलं म्हणजे काय? ते काही धोतर आहे का सोडायला? आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांचं हिंदुत्व कुठे आहे? बाबरी पाडली तेव्हा जे बिळात लपले होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. आपली मुंबई, आपलं कार्ड पुढे चला या बेस्टच्या कार्डचा सोहळा मुंबईत रंगला होता त्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आहे. घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवू नये असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

“मला राजकारणाची पर्वा नाही. अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय किती बोलावं? याला मर्यादा असते. सगळे ताळतंत्र सोडत असतील तर आम्हीही थोडं ताळतंत्र सोडू शकतो. हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. म्हणजे आम्ही नेमकं काय सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? की घातलं, नेसलं आणि सोडलं. असं मुळीच नाही. एक मुद्दा मी मुद्दाम सांगेन जे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलंत? ज्यावेळी बाबरी पाडली तेव्हा सुद्धा तुम्ही बिळात लपला होतात.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा देखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही. तो निर्णय कोर्टाने दिला आहे. राम मंदिर बांधतानाही तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवल्या आहेत. तुमचं हिंदुत्व आहे कुठे? शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे ते हेच आहे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवायला जाऊ नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. हनुमान चालीसा पठण करायचं आहे खुशाल करा. रामदासस्वामींनीही अप्रतिम मारूती स्तोत्र लिहून ठेवलं आहे. भीमरूपी महारूद्रा.. भीमरूप आणि महारुद्र रूप काय असतं तर शिवसेनेच्या अंगावर आलात तर दाखवायला कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा. “

ADVERTISEMENT

आमचं हिंदुत्व हनुमानाच्या गदेसारखं

ADVERTISEMENT

“आमचं हिंदुत्व हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. या घरी यायचं आहे नक्की या. हनुमान चालीसा तुमच्या घरी म्हणता येत नसेल तर आमच्या घरी येऊन म्हणा. पण त्याची काहीतरी पद्धत असते. लहान असल्यापासून मी बघत आलोय मातोश्रीवर साधू संत येतात. आमच्या घरात दिवाळी असो दसरा असो तेव्हा साधूसंत येतात. मात्र ते नीट बोलून आणि सांगून येतात. मै आपके घर आना चाहता हूँ कुछ तो बताना चाहता हूँ असं सांगितलं तर स्वागत नक्की करू. मात्र दादागिरी करून याल तर ती दादागिरी कशी मोडायची ते आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजावून सांगितलं आहे.”

“लवकरात लवकर मला एक जाहीर सभा घ्यायची आहे. हल्ली सभेचं पेव फुटलंय. कोरोना गेला असं सगळ्यांना वाटतंय. निदान मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत मास्क काढू नका. मास्क सक्ती जरी नसली तरीही अजूनही मास्क मुक्ती झालेली नाही. एक भान ठेवून पुढे जाऊ. लवकरात लवकर सभा घ्यायची आहे आणि तिकडे मला मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला लावूनच टाकायचा आहे. तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नकली, नवहिंदू. तेरी कमीज मेरी कमीजसे भगवी कैसे? हा त्यांचा पोटशूळ. त्यांचा समाचार मला घ्यावा लागणारच आहे. तो घ्यायचा तेव्हा मी घेणारच आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT