नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली किमान समान कार्यक्रमाची आठवण, लिहीलं पत्र
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. या चर्चा ताज्या असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लिहीलेल्या पत्रामुळे या चर्चांना आता आणखीनच उधाण आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत पटोलेंनी किमान समान कार्यक्रमाची आठवण करुन दिली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन होत […]
ADVERTISEMENT

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. या चर्चा ताज्या असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लिहीलेल्या पत्रामुळे या चर्चांना आता आणखीनच उधाण आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत पटोलेंनी किमान समान कार्यक्रमाची आठवण करुन दिली आहे.
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन होत असताना किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार चालवणार असल्याचं ठरलं होतं. कोरोना काळातील संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोलेंनी आपल्या पत्रात काय लिहीलं आहे?
जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने २०१९ साली तीन पक्ष एकत्र आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या सुचनेनुसार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालेल असे ठरलेले आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे. सोनियाजी गांधी यांनी दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठीच्या योजनांवर सरकारने काम करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना याआधीही पत्र पाठवले होते. कोरोनामुळे राज्य सरकारपुढे अडचणी होत्या. पण या कठीण प्रसंगीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने चांगले काम केले आहे. आता सर्व व्यवहार सुरुळीत सुरु असून अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली आहे. आता सीएमपी व दलित, ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबाजवाणी करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी.
दरम्यान, नाना पटोलेंनी लिहीलेलं पत्र प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर नाना पटोलेंनी सरकार अस्थिर असल्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आघाडी सरकारमध्ये असे प्रकार होतच असतात. त्यात नवीन काहीच नाही. काही मुद्द्यांवर आमदारांनी किंवा नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही. भाजपाकडून आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत असंही नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.