मुंबईत सणासुदीच्या काळात वाढू शकतात कोरोनाचे रूग्ण, आरोग्य तज्ज्ञ असं का म्हणत आहेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. मागचे दोन दिवस ४०० रूग्ण मुंबईत पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. मुंबईत जसे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत तसेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही कोरोना रूग्ण वाढत आहेत. दिल्ली आणि मुंबईत सणासुदीच्या काळात कोरोना रूग्णांची संख्या वाढू शकते असं मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढणार?

मुंबईत सणासुदीच्या काळात कोव्हिड १९ चे रूग्ण वाढू शकतात. व्हायरल इनफेक्शनच्या नावे जो संसर्ग रूग्णांना होऊ शकतो तो कोव्हिडचाही व्हायरस असू शकतो कारण व्हायरस कधीही मरत नाही. कोरोना संसर्ग पुन्हा वाढला तरीही मृत्यूंचं प्रमाण कमी असेल तसंच रूग्णालयात रूग्णांना दाखल करण्याचंही प्रमाण कमी असेल मात्र लोकांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोना संपला आहे या भ्रमात राहू नये असंही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साळी यांनी इंडिया टुडेशी बोलताना हे सांगितलं की जेव्हा दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढतात तेव्हा मुंबईतही कोरोनाचे रूग्ण वाढतात हे दिसून आलं आहे. जैन बांधवांचं पर्युषण पर्व आता सुरू होईल. त्यानंतर गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आहेत हे सगळे सण उत्सव एका पाठोपाठ एक येत आहेत. लोक कोरोना प्रतिबंधक उपाय विसरले आहेत, मास्कला त्यांनी रामराम केला आहे. असं सगळी परिस्थिती पाहता कोरोनाचे रूग्ण मुंबईत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असं भन्साळी यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

मंकीपॉक्स आहे की कोरोना, कसं ओळखायचं? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या दोन्ही आजारांमधील फरक

अशा सगळ्या परिस्थितीत नेमकं काय करता येईल?

डॉ. भन्साळी यांनी सांगितलं की सध्याच्या परिस्थितीत मास्क लावणं हे काळजी घेणं ठरू शकेल. जर कुणाला साधा सर्दी खोकला जरी झाला आहे आणि ती व्यक्ती जर गर्दीच्या ठिकाणी जात असेल तर त्या व्यक्तीने मास्क लावणं अनिवार्य असलं पाहिजे लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे तसंच आपल्यामुळे संसर्ग वाढणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.

ADVERTISEMENT

7 राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

ADVERTISEMENT

स्वाईन फ्लूचं संकट आता गहिरं होतं आहे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या मुंबईत स्वाईन फ्लूचे रूग्ण वाढत आहेत. मात्र या आजाराच्या पद्धतीत काहीसा बदल झाला आहे. मुंबईत स्वाईन फ्लू हा आजार अनेक वर्षांनी परतला आहे. स्वाईन फ्लूची लक्षणं जाणवल्यावर लोकांनी लगेच डॉक्टरांकडे धाव घेऊन उपचार सुरू केले पाहिजेत. तसंच झालं नाही तर मात्र स्वाईन फ्लू धोकादायक ठरू शकतो.

मुंबई महापालिकेचं काम योग्य मार्गावर आहे का?

मुंबईतल्या वॉर्ड्समध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग आणि व्हॅक्सिनेशन ही त्रिसूत्री राबवण्यात येत आहे. डॉ. भन्साळी हे खासगी रूग्णालयांचे को ऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत. त्यांनी मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे. हे मॉडेल जगभरात पोहचलं. आता याच धर्तीवर सध्या मुंबईत महापालिका त्यांचं काम करते आहे.

आपण सणासुदींमध्ये, उत्सवांमध्ये सहभागी व्हायचं का?

कुठल्याही निर्बंधाशिवाय थाटात सण साजरे करा अशी घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. अशात आता कोरोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता, स्वाईन फ्लूचं संकट या सगळ्यामध्ये सण साजरे करायचे की नाही हा प्रश्नही आम्ही डॉ. भन्साळी यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की आनंदाने आणि उत्साहाने सण साजरे करा. उत्सव काळात लोकांनी एकमेकांना भेटणंही गैर नाही. मात्र जे रोग वाढण्याची भीती आहे त्या रोगासंदर्भात योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT