नवनीत राणांची संपत्ती किती… बँक खात्यात ‘D’ गँगचा पैसा?
मुंबई: ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा म्हणण्यावरून वादात सापडलेल्या राणा दाम्पत्याला तुरुंगात जावं लागलं. पण आता याच राणांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांनी टाकलेल्या ट्विटर बाँम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राणांच्या खात्यात डी गँगशी संबंधित युसूफ लकडावालाचे पैसे असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसंच या प्रकरणात ईडी, भाजप गप्प का असा सवालही […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा म्हणण्यावरून वादात सापडलेल्या राणा दाम्पत्याला तुरुंगात जावं लागलं. पण आता याच राणांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांनी टाकलेल्या ट्विटर बाँम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राणांच्या खात्यात डी गँगशी संबंधित युसूफ लकडावालाचे पैसे असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसंच या प्रकरणात ईडी, भाजप गप्प का असा सवालही केला आहे.
राऊतांचा नेमका दावा काय, आणि राणांची नेमकी संपत्ती किती, ही संपत्ती कोणत्या मार्गानं कमावली. जाणून घ्या याबाबत सविस्तर.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी 26 एप्रिलला एक ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. नवनीत राणांच्या खात्यात अंडरवर्ल्डचा पैसा असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. दाऊद गँगशी संबंधित युसूफ लकडावालाला ईडीने दोनशे कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग केसमध्ये अटक केली होती.
तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. त्याच लकडावालाने अवैधपणे कमावलेल्या पैशातला वाटा अजूनही नवनीत राणांच्या अकाऊंटमध्ये आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. हा आरोप करताना राऊतांनी नवनीत राणांच्या यांच्याशी संबंधित एका पुरावाही जोडला आहे.
2019 मध्ये अमरावती मतदारसंघातून राणांनी लोकसभा निवडणूक लढवली. यावेळी राणांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रासोबत आपली संपत्तीही जाहीर केली. याच संपत्तीत दाऊद गँगचाही पैसा असल्याचा आरोप राऊतांनी केला. त्यामुळे आपण नवनीत राणा, रवी राणांची संपत्ती किती, संपत्तीमध्ये कशाकशाचा समावेश आहे, ते आपण सविस्तर पाहूयात.
निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, नवनीत राणा आणि रवी राणा हे पेशानं सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकरी आहेत. तसंच राणांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून येणारं भाडं आणि शेतीतलं उत्पन्न हेच आपल्या कमाईचं साधन असल्याचं सांगितलं आहे.
2019 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नवनीत राणांकडे तब्बल 12 कोटी 45 लाख 54 हजार 656 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये सुमारे 7 कोटी 5 लाख 76 हजार रुपयांची कर्ज, देणी यांचा समावेश आहे. 2017-2018 या आर्थिक वर्षासोबतच गेल्या चार वर्षांमध्ये नवनीत राणांची कमाई सरासरी सव्वाचार लाख रुपये इतकी आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या संपत्तीसोबतच कुटुंबाच्या संपत्तीचीही माहिती द्यावी लागते. यामध्ये राणांनी आपले पती आमदार रवी राणांच्या कमाईचीही माहिती दिली आहे. 2017-18 मध्ये 23 लाख 13 हजार रुपये इन्कम असलेल्या रवी राणांची कमाई 2013-14 मध्ये निव्वळ 3 लाख 47 हजार रुपये एवढी होती.
राणा दाम्पत्याच्या याच एकूण संपत्तीमध्ये रोख रक्कम, बँकेतल्या ठेवी, कर्ज आणि उसनवारी यांचाही समावेश आहे. राणा दाम्पत्यांकडे 2019 मध्ये रोख पाच लाख आणि मुंबई, अमरावतीतील बँकेत सहा लाख रुपये जमा होते. तसंच वैयक्तिक कर्ज, काही देणीसुद्धा राणांवर आहेत. सध्या याच कर्जांवरून नवनीत राणा वादात सापडल्या आहेत.
राणांनी एकूण अडीच कोटींपैकी तब्बल 80 लाख रुपयांचं कर्ज हे युसूफ लकडावाला याच्याकडून घेतलं आहे. याशिवाय राणांकडे जवळपास 82 लाखांच्या तीन चारचाकीही आहेत. 29 लाखांचे दागदागिने आहेत. कर्ज, गाड्या, दागिने अशी तब्बल 3 कोटी 72 लाख रुपयांची जंगम मालमत्ता राणा दाम्पत्याकडे आहे. यामध्ये नवनीत यांच्याकडे जवळपास तीन कोटींची तर, रवी राणांकडे 69 लाखांची मालमत्ता आहे.
युसुफ लकडवालाचे शरद पवार- राजीव गांधींशीही संबंध, फोटो दाखवत मोहित कंबोज यांचा आरोप
तसंच शेतजमीन, घर, व्यापारी गाळे अशी 8 कोटी 37 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये नवनीत राणांकडे 6 कोटी 15 लाख, तर रवी राणांकडे 1 कोटी 22 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. राणांच्या याच संपत्तीबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.