Maharashtra Budget Live: भाजप-सेना खवळली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राऊतांविरोधात भाजप-शिवसेना आक्रमक

संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत भाजप आणि शिवसेनेनं त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी केली. भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले, “राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. राजकारणात एकमेकांच्या विरोधात असू शकतो. विधिमंडळाच्या स्थानाबद्दलचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे. आमच्या समोर बसलेले काय भूमिका घेणार आहे? आरोप करू शकतो, पण एकमेकांना चोर म्हणू शकतो का? असा सवाल शेलार यांनी विरोधी पक्षनेते आशिष शेलार यांना केला.

ADVERTISEMENT

चोर मंडळ बोल शकतो का? हे कायदे मंडळ आहे. चोरांना पकडण्यासाठी कायदे करणार मंडळ आहे. या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं आणि महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात महाराष्ट्राचा अपमान करायचा. हा महाराष्ट्रद्रोह आहे. कुणी यांना परवानगी दिली? इथे वायकर, प्रभू, साळवी बसलेले आहेत. माझं आवाहन आहे तुम्हाला, महाराष्ट्राच्याबद्दल ही भावना तुमच्या मनात असेल, तर स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. या सदनाबद्दल आणि सदस्यांबद्दल असा भाव, या सदनात काय दाऊद आहे का? त्यांना तुम्ही चोर म्हणत नाही. या सदनात बसलेल्या सदस्यांना तुम्ही चोर म्हणता. या सदनातील मंडळाला तुम्ही चोरमंडळ म्हणता, माझी विनंती यावर कारवाई झाली पाहिजे. समोरच्या सदस्यांनी बोटचेपी भूमिका घेणं अपेक्षित नाहीये. विधिमंडळाच्या बाबतीत अशी भूमिका अजिबात अपेक्षित नाही,” असं शेलार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “आशिष शेलार यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे. आपण सगळे विधिमंडळातील सदस्य 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने, कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही व्यक्तिला अशा पद्धतीने चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाहीये. एक व्यक्ती विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याची बातमी आली आहे. आशिष शेलार यांच्या मताशी मी सहमत आहे. पक्षीय बाबी बाजूला ठेवून याकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. कारण शेवटी प्रत्येकाने शिस्त, नियम पाळला पाहिजे.”

हे वाचलं का?

“संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. परंतु काहीही बोलायला लागलं आणि असे आरोप करत असेल, तर… आता त्या बातमीत तथ्य आहे का? हे तपासलं पाहिजे. जे बोलले त्यांची बाजू घेतोय असं नाहीये. ते बोलले असतील, तर योग्य निर्णय घ्यावा. पण, त्यांची शहनिशा केली पाहिजे. अशा बाबतीत बातम्या येतात. कधी तथ्य असतं, नसतं. पण, जर ती व्यक्ती खरोखरच तसं बोलली असेल, तर मग ती व्यक्ती कुठल्याही राजकीय पक्षाची असो, कुठल्याही पदावर असो, त्यांना व्यवस्थित मेसेज देण्याचं काम आणि विधिमंडळाचा मानसन्मान ठेवण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे, असं आमचं मत आहे.”

राऊतांच्या विधानानंतर सभागृहात काय घडलं? पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

संजय राऊतांच्या विधानाने वाद, शिवसेनेवर टीका करताना म्हणाले चोर

कोल्हापूर येथे बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना एक विधान केलं. त्यावरून वाद निर्माण झाला. “सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली. असे गेल्या सहा महिन्यात या सरकारने ईडब्ल्यूच्या माध्यमातून 28 चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला. जे विरोधात आहेत. त्यांना तुरुंगात टाकायचं. खोटे गुन्हे दाखल करायचे. बदनाम करायचं. लक्षात ठेवा. 2024 ला याचा हिशोब केला जाईल”, असं विधान संजय राऊतांनी केलं.

ADVERTISEMENT

“ही जी बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावर काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली आहेत. ती आम्ही पक्षासाठी ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीये. पदं गेली पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे”, असं विधान संजय राऊतांनी कोल्हापुरात केलं.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे जयंत पाटील अधिवेशनात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल झाले. हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज जयंत पाटील विधिमंडळ परिसरात दिसले. यावेळी ते म्हणाले, “कांदा उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका सरकारची नाही. सरकार टाळाटाळ करत आहे. आम्ही त्याविषयी सभागृहात भूमिका मांडणार आहोत”, असं जयंत पाटील म्हणाले.

नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर ‘वार’, तेव्हा म्हणाले…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी मांडलेल्या भूमिकेचा हवाला देत टीका केली. “राज्याचे उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) हे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा सांगत होते की, मध्य प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. राज्याच्या सरकारनेही तसा निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे उपमुख्यमंत्री आता शेतकऱ्यांची वीज तोडणी करत आहेत. शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा करण्याचं सांगितलं होतं. 8 तासही वीज पुरवठा केला जात नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. आमचं सरकार आल्यानंतर महागाई कमी करू, असं सांगितलं होतं. आजच सिलेंडर 50 रुपयांनी महागले आहेत. राज्यातील, केंद्रातील सरकार स्वतःची पाठ थोपटवत आहे. गॅस दरवाढीविरोधात आणि शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात आम्ही हे निदर्शनं करत आहोत.”

विरोधकांच्या घोषणांनी विधिमंडळ परिसर दणाणला

अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निर्दशनं केली. शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्याचबरोबर शेतकऱ्याची वीज बिलं माफ करण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवारांसह महाविकास आघाडीतील आमदारांनी पायऱ्यावर सरकारविरोधात घोषणा दिल्या.

कांदा, कापसासह शेतमालाच्या दराचा मुद्दा

कांद्याचे पडलेले भाव, सोयाबीन, कापसाला हमीभाव देण्याची मागणी, यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. कांदा खरेदीबद्दलही विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. हा मुद्दा पुन्हा एकदा विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो.

अजित पवाराचे शिंदे-फडणवीसांना टोले

राज्यपाल अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. विविध मुद्द्यांवर बोट ठेवत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले.

Eknath Shinde । Devendra Fadnavis । ajit Pawar । bhaskar Jadhav । jayant Patil । Maharashtra Budget Session Live Updates : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असून, विविध मुद्द्यांवरून विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी विरोधकांवर पलटवार करताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधकांमध्ये राजकीय खडाजंगी बघायला मिळाली.

विधिमंडळातील कामकाज पाहण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT