आदित्य ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्या ‘त्या’ भेटीत काय घडलं?; राऊतांनी ‘रोखठोक’मधून उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली. ममतांच्या दौऱ्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्या टीकेनंतर राऊतांनी भाजपला उत्तर देत भेटीतील चर्चेची माहिती ‘रोखठोक’मधून दिली.

ADVERTISEMENT

संजय राऊत म्हणतात…

‘दिल्लीत ममता बॅनर्जी यांना भेटण्याचा योग अनेकदा येतो. मुंबईच्या ‘ट्रायडेण्ट’ हॉटेलात आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने त्यांना भेटलो. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली. तेव्हा मला गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाली. मुंबईतील उद्योगपतींना गुजरातेत येण्याचे निमंत्रण घेऊन त्या आल्या व मुंबईत येऊन मुंबईचीच बदनामी करून गेल्या. ‘मुंबई में क्या रखा है? इथले रस्तेही खराब आहेत. तेव्हा गुजरातला चला.’ असे निमंत्रण त्यांनी दिले. तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.”

हे वाचलं का?

“ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील विकासाचे उद्योगपतींकडे कौतुक केले व प. बंगालकडे दृष्टी वळवा, असे सांगितले. शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण महाराष्ट्राचीही ती राजधानी आहे. याचे भान ठेवून जे राज्यकर्ते मुंबईत उतरतात त्यांचे स्वागत आहेच. देशाचा आर्थिक भार मुंबईच्या डोक्यावर आहे. मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल.”

“महाराष्ट्राने प. बंगालच्या विकासासाठी सहकार्य करायला हवे. आदित्य ठाकरे यांच्याकडे ममता बॅनर्जी यांनी एक मागणी केली, ‘प. बंगालमधून मुंबईत उपचारासाठी लोक येतात. विशेषतः परळच्या टाटा कॅन्सर इस्पितळात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. प. बंगालला एखादा भूखंड मिळाला तर तेथे ‘बंगाल भवन’ उभारता येईल व अशा गरजूंची व्यवस्था करता येईल.’ ममता बॅनर्जी यांची मागणी अवाजवी नाही. मुंबईच्या आसपास ओडिशा भवन, उत्तर प्रदेश भवन आधीच उभे राहिले आहे. प. बंगालचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक क्रांतीत योगदान आहे. दोन राज्यांत एक भावनिक नाते आहे. ते टिकवायला हवे,” असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘आम्ही महाराष्ट्रात येणार नाही’

ADVERTISEMENT

ममता बॅनर्जींसोबतच्या भेटीबद्दल राऊत म्हणाले, “ममता बॅनर्जी यांनी बंगालात प्रचंड विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाची सत्ता व मत्ता यांचा दारुण पराभव केला. एखाद्या वाघिणीसारख्याच त्या लढल्या. केंद्रातले मोदींचे सरकार कसे छळवाद करीत आहे व बंगालचे सरकार व जनता या छळवादाशी कसे नेटाने लढत आहे ते त्यांनी सांगितले. प. बंगालचे राज्यपाल रोजच अडवणुकीचे धोरण स्वीकारतात. ‘ईडी’चे पन्नास लोक कोलकात्यात बसवून ठेवले आहेत व ते मंत्री, आमदारांवर खोटे गुन्हे दाखल करतात. प. बंगालची यथेच्छ बदनामी भाजप व केंद्रीय यंत्रणा करतात, पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही.”

“मराठा व बंगाली हे लढणारे लोक आहेत. ते मागे हटणार नाहीत, असे श्रीमती बॅनर्जी म्हणाल्या. देशाच्या राजकीय घडामोडींचा वेध त्या घेत आहेत. प. बंगालच्या सीमा पार करून त्या गोवा, मेघालय, त्रिपुरात पोहोचल्या. ‘महाराष्ट्रात आम्ही येणार नाही. इथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी आहे,’ असे त्या म्हणाल्या. काँग्रेसला वगळून नवे काही घडवावे असा विचार त्या करत असाव्यात असे एकंदरीत दिसते. आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवले, तरीही त्या आल्या. ‘तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करीत आहे. तरुणांची शक्ती मला माहीत आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवे!”

“त्या लूटमारीवरही भाजपने भाष्य केले नाही, पण…”

“शिवरायांचा हा विचार ममता बॅनर्जी एक आशीर्वाद म्हणून घेऊन आल्या. त्यांनी जाताना सोबत काहीच नेले नाही, हे उगाच ओरड करणाऱ्यांनी व मुंबईस ओरबडणाऱ्यांना साथ देणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. भारतीय जनता पक्ष विरोधासाठी विरोध करतो हे ममतांच्या दौऱ्यातही दिसले. ‘मुंबईत येऊन ममता बॅनर्जी उद्योगपतींना भेटल्या. मुंबईतील उद्योग बंगालात पळवायचा त्यांचा डाव आहे,’ असे बिनबुडाचे आरोप भाजपच्या आशिष शेलार यांनी केले. मुंबईत येऊन उद्योगपतींना भेटण्यात गैर काय?”, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

“मुंबई देशाची औद्योगिक व आर्थिक राजधानी आहे. देशाच्या तिजोरीत सवादोन लाख कोटींचे योगदान एकटे मुंबई शहरच देते. मुंबईच देशाचे पोट भरत असते, हे विसरता येणार नाही. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणारे भाजप नेतृत्व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मुंबईतील हालचालीवर आक्षेप घ्यायला तयार नाही.”

“ममतांच्या पाठोपाठ गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांचे अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. ‘व्हायब्रण्ट गुजरात’साठी मुंबईतील उद्योगपतींना गुजरातचे निमंत्रण देण्यासाठी ते आले. आत्मनिर्भर गुजरात उभारण्यासाठी त्यांना मुंबईतील उद्योगपतींची मदत हवी. म्हणजे गुजरातचा औद्योगिक विकास व अर्थकारण मुंबईवर अवलंबून आहे व खुंटा बळकट करण्यासाठीच मुख्यमंत्री पटेल येथे अवतरले, असेच भाजपचे मत असायला हवे. पटेल यांनी मुंबईत येऊन उद्योगपतींना साकडे घालायला काहीच हरकत नाही, पण भाजपने ममतांवर नाहक टीका केली. म्हणून पटेलांचा विषय समोर आणला. योगी आदित्यनाथ तर मुंबईतील सिनेउद्योग लखनौला नेण्यासाठीच आले. त्यावरही भाजपने आक्षेप घेतला नाही. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र एका रात्रीत अहमदाबादला खेचून नेले. त्या लूटमारीवरही भाजपने भाष्य केले नाही, पण ममता बॅनर्जी प्रकरणात भाजपची भूमिका टोकाची आहे”, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT